आरोग्य सेवेच्या नावाखाली लूट
By Admin | Updated: September 9, 2015 02:41 IST2015-09-09T02:41:54+5:302015-09-09T02:41:54+5:30
आरोग्य सेवेच्या नावावर रुग्णांना लुटण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला असून विविध तपासण्या आणि औषधाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहे.

आरोग्य सेवेच्या नावाखाली लूट
स्वप्नील कनवाळे पोफाळी
आरोग्य सेवेच्या नावावर रुग्णांना लुटण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला असून विविध तपासण्या आणि औषधाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहे. त्यातच वैद्यकीय क्षेत्रातही कमिशनखोरी सुरू झाल्याने गावखेड्यातील डॉक्टर रुग्णांना शहरातील मोठ्या डॉक्टरांकडे पाठवितात. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने लूट सुरू होते. खासगी दवाखान्यांचा कारभार सरकारी नियंत्रणाबाहेर असून गोरगरिबांना मात्र पैशाअभावी खासगीत उपचार मिळत नसल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचा फायदा खासगी डॉक्टर घेत आहे. गावातील बीएएमएस अथवा समकक्ष पदवीधारक डॉक्टरांकडे गेल्यानंतर तो उपचार करतो. परंतु औषधी दिल्यानंतरही रुग्णालया बरे वाटले नाही की तो शहरातील मल्टीस्पेशालिटी अथवा स्पेशालिट डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतो आणि येथून सुरू होतो रुग्णाला लुटण्याचा गोरखधंदा. गावातील डॉक्टर संबंधित रुग्णालया चिठ्ठी लिहून शहरातील डॉक्टरांकडे पाठविले जाते. या चिठ्ठीतच सर्व काही दडलेले असते. पाठविलेल्या रुग्णाच्या मोबदल्यात गावातील डॉक्टरला कमिशन दिले जाते. एकदा हा रुग्ण शहरात पोहोचला की, त्या ठिकाणी सर्व प्रथम तपासणीचे २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. डॉक्टरांनी तपासल्यानंतर छापील कागदावरील तपासण्यावर खुणा करून डॉक्टर चिठ्ठी रुग्णाच्या हातात देतो. त्यात विविध तपासण्या लिहिलेल्या असतात. एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त यासह इतरही तपासण्यांचा समावेश असतो. काही रुग्णालयात तर थेट पॅथॉलॉजीचे तंत्रज्ञ हजरच असतात. डॉक्टरांनी चिठ्ठी दिली की त्याच ठिकाणी रुग्णाचे रक्त काढून तपासणीसाठी तत्पर असतात. यात रुग्णाचे ५०० ते हजार रुपये निश्चितच जातात. त्यानंतर तपासण्याचा रिपोर्ट आल्यावर डॉक्टर औषधाची यादी लिहून देतो. या यादीतील औषधी घेताना रुग्णाचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते.
रिपोर्टमध्ये काही आढळल्यास रुग्णाला भरती होण्याचा सल्ला दिला जातो. औषधा पेक्षाही तेथील सेवेचाच पैसा अधिक मोजावा लागतो. एका खोलीचे भाडे दिवसाला एक ते दीड हजार रुपये, डॉक्टरांची फी, नर्सिंग चार्ज आदी करून १५ ते २० हजाराच्या आसपास साध्या तापातही बिल रुग्णाच्या हाती येऊ शकते.
गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण मोठ्या आशेने खासगी रुग्णालयात येतात. परंतु तेथील फी आणि खर्च पाहून अर्धवट उपचार करून घरी जातात. त्यामुळे धड आजारही बरा होत नाही. शासकीय रुग्णालयात जावे तर तेथे केवळ पांढऱ्या गोळ्याच हातात दिल्या जातात, असे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सांगतात.