शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करा

By Admin | Updated: September 9, 2015 02:42 IST2015-09-09T02:42:55+5:302015-09-09T02:42:55+5:30

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे,

Please forgive all types of debt of farmers | शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करा

शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करा

सुधाकर अक्कलवार  घाटंजी
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश लोणकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची स्थिती आणि सरकारचे धोरण या मुद्यावर लोणकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलेपत्र लिहिले. त्याबाबत त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे दोन लाख शेतकरी सभासद आहे. त्यातील १ लाख १७ हजार शेतकरी थकबाकीदार असून ८७ हजार शेतकऱ्यांना चालू कर्ज मिळाले आहे. या नियमित शेतकऱ्यांना ४१५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले गेले आहे तर, थकीत सभासदांकडे ४९४ कोटी रुपये थकीत आहे. असे एकूण दोन लाख शेतकऱ्यांकडे ९०९ कोटी रुपये थकले आहे. तसेच मोटरपंप, पाईप लाईन, स्प्रिंकलर, ठिबक आदींसाठी घेतलेले ९४ कोटी रुपयांचे मध्यम मुदती कर्ज थकीत आहे. नदी, नाले, विहिरी पावसाअभावी कोरड्या पडल्याने या खर्च केलेल्या कर्जाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. मात्र त्यावरील व्याज कायम आहे. जिल्हा बँकेचे अनेक शेतकऱ्यांकडे वाहनांसाठी दिलेले ५६ कोटी रुपयांचे बिगर शेती कर्ज तर शिक्षण व उद्योगासाठी दिलेले एक कोटी २० लाखांचे कर्ज थकीत आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे. कृषी मूल्य आयोगाने कापूस व सोयाबीनला हमीभावात केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात कारखानदारांचे ४५ हजार कोटी रुपये माफ झाले. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांचे ५० हजार कोटींचे कर्ज माफ केले गेले. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सरकारला अडचण का भासावी, असा प्रश्नही लोणकर यांनी उपस्थित केला. गेल्या सरकारने कमी प्रमाणात का होई ना दोनदा कर्जमाफी दिली. आता युती सरकारनेही सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे.

Web Title: Please forgive all types of debt of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.