सरकारी कार्यालयांच्या खुल्या जागेत क्रीडांगण
By Admin | Updated: February 14, 2016 02:22 IST2016-02-14T02:22:15+5:302016-02-14T02:22:15+5:30
सरकारी कार्यालयाच्या खुल्या जागेत क्रीडांगण तयार केले जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे,

सरकारी कार्यालयांच्या खुल्या जागेत क्रीडांगण
संजय राठोड : जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकार्पणप्रसंगी हितगूज, शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना
यवतमाळ : सरकारी कार्यालयाच्या खुल्या जागेत क्रीडांगण तयार केले जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. शनिवारी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या नूतणीकरण इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
शहरात खेळाच्या मैदानाची समस्या आहे, तर दुसरीकडे शासकीय कार्यालय परिसरात मोठी जागा पडित आहे. या ठिकाणी क्रीडांगण तयार केल्यास युवकांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान मिळेल. शिवाय शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. दुहेरी उद्देश यातून साध्य होणार असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या नूतणीकरणावर ४४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते कार्यकारी अभियंता चंद्रशेखर मेहेत्रे, कंत्रादार मुंधडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राठोड, सहाय्यक माहिती अधिकारी गजानन कोटुरवार उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या मदतीबाबत छेडले असता, शेतकरी आत्महत्या हा राजकीय विषय नसून ती सामाजिक समस्या असल्याचे सांगितले. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माध्यमातून शेतकरी आत्महत्या, असा शब्दप्रयोग करून नये, अशी सूचनाही केली. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याचे परिणाम येण्यास वेळ लागणार आहे.
कृषिपंपांना योग्य दाबाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी नियोजन समितीने ७० कोटी रुपये वीज कंपनीला दिले आहे. यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज रोहित्र उभारले जाणार आहे. यवतमाळातील बस्थानकाची दुरूस्ती लवकरच होणार असून बसपोर्टमध्ये याचा समावेश केल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. याचवेळी कार्यकारी अभियंता म्हात्रे यांनी वाघापूर जवळ बस्थानकासाठी प्रस्तावित जागा असल्याचे सांगितले. रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी शुक्रवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाकरिता पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. टिपेश्वर येथे पर्यटन विकास करण्यासाठी मोठा निधी शासनाकडे मागितला आहे, त्याचप्रमाणे धामणगाव देव, चौसाळा , खटेश्वर येथेही पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. प्रसंगी विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.