खेळाडूंनो, सुवर्ण पदकासाठी खेळा!

By Admin | Updated: March 4, 2017 00:59 IST2017-03-04T00:59:25+5:302017-03-04T00:59:25+5:30

खेळ देशाचा गौरव असतो. विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करीत असते. तेव्हा खेळाडूंनी खेळाचे कौशल्य प्राप्त

Players, play for the gold medal! | खेळाडूंनो, सुवर्ण पदकासाठी खेळा!

खेळाडूंनो, सुवर्ण पदकासाठी खेळा!

अशोक ध्यानचंद : विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेचे उद्घाटन
यवतमाळ : खेळ देशाचा गौरव असतो. विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करीत असते. तेव्हा खेळाडूंनी खेळाचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करावे, दररोज आपल्या खेळाचे विश्लेषण करावे, खेळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची आकांशा ठेवावी व देशासाठी सुवर्ण पदक प्राप्त करण्याच्या ध्येयाने खेळावे, असे आवाहन हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांचे सुपुत्र माजी आॅलिम्पिक खेळाडू अशोक कुमार यांनी विदर्भस्तरीय वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट व यवतमाळ वुमेन्स स्पोर्टस् क्लबच्यावतीने येथील नेहरू स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला आहे. शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आॅलिम्पिकपटू अशोक ध्यानचंद होते. अध्यक्षस्थानी विनायक दाते होते. यावेळी मंचावर विदर्भ हॉकी संघटनेचे सचिव डी. करुणाशंकर, सहसचिव प्रमोद जैन, शिवछत्रपती पुरस्कार विजेते टी.एन. सिंध्रा, श्याम शर्मा, प्रदीप शेटीये, अनिल नायडू, बबलू यादव आदींची उपस्थिती होती.
अशोककुमार यांनी ध्यानचंद यांच्या परिवारातून व त्यांचा सुपुत्र असल्याचा अभिमान वाटत असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. राष्ट्रीय वर्ल्ड कप व आॅलिम्पिक स्पर्धेतील अनुभव विषद केले. तसेच हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्या प्रेरणात्मक आठवणींना उजाळा दिला. उल्लेखनीय म्हणजे यवतमाळचे खेळाडू बबलू यादव यांच्यासोबत १९७१ मध्ये कटक (ओरिसा) येथील राष्ट्रीय स्पर्धेत सोबत खेळल्याचा अभिमानाने उल्लेख केला.
यावेळी अशोककुमार यांचा यवतमाळ नगरीच्यावतीने पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डी.करुणाशंकर यांनी केले. संचालन प्रा.अनंत पांडे यांनी तर आभार मनीषा आकरे यांनी मानले. (क्रीडा प्रतिनिधी)
 

Web Title: Players, play for the gold medal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.