प्लास्टिकची पुन्हा बजबजपुरी
By Admin | Updated: March 6, 2016 03:13 IST2016-03-06T03:13:30+5:302016-03-06T03:13:30+5:30
प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात नगरपालिकेची कारवाई थंडावल्याने शहरात पुन्हा ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग सर्वत्र वापरल्या जात आहे.

प्लास्टिकची पुन्हा बजबजपुरी
नगरपरिषदेचे दुर्लक्ष : पुसदमध्ये पुन्हा कॅरिबॅगचा सर्वत्र वापर
पुसद : प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात नगरपालिकेची कारवाई थंडावल्याने शहरात पुन्हा ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग सर्वत्र वापरल्या जात आहे. किराणा दुकानांसह दूध डेअरी, फळ भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.
पुसद नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्त झाल्यानंतर डॉ. अजय कुरवाडे यांनी काही नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच भाग म्हणून शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. शासनाने यापूर्वीच कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध घातले असताना नगर परिषदेमार्फत मात्र ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. परंतु मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी कठोर भूमिका घेतल्याने शहरातील प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रेत्यांवर संक्रांत कोसळली होती. प्लास्टिक पिशव्यांच्या होलसेल विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारुन दंडही ठोठावला होता. त्यासोबतच किराणा दुकाने, भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु नगर पालिकेच्या या कारवाईत सातत्याने नसल्याने शहरात कॅरीबॅगचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या वापरण्यास परवानगी आहे. अशाच पिशव्यांचा वापर करता येत असला तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी जाडीच्या प्लॉस्टिक पिशव्या वापरल्या जात आहे. ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीची प्लॉस्टिक पिशवी एकदा वापरल्यानंतर ती उकिरड्यावर फेकली जाते. या पिशवीची विल्हेवाट लावणे शक्य होत नसल्याने प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. एक कॅरीबॅग २० ते २५ पैशांना तर ५० मायक्रॉन पेक्षा जास्त जाडीची पिशवी दीड रुपयाला मिळते. त्यामुळे स्वस्त असलेली पिशवीच मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. साधारणपणे दररोज २५० किलो पेक्षा जास्त पिशव्यांचा वापर होत आहे. पालिकेचे याकडे दुर्लक्ष असल्याने गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)