पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावा
By Admin | Updated: May 26, 2016 00:12 IST2016-05-26T00:12:35+5:302016-05-26T00:12:35+5:30
वाहनांची वाढती संख्या, तसेच लोकसंख्येतील वाढीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होत आहे.

पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावा
मनोहरराव नाईक : वन महोत्सवांतर्गत कार्यशाळा
पुसद : वाहनांची वाढती संख्या, तसेच लोकसंख्येतील वाढीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावा. त्यातूनच भावी पिढीचे संगोपन आणि संवर्धन होईल. असे प्रतिपादन आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सवांतर्गत वृक्ष लागवड करणे, जलयुक्त शिवार अभियान, बळीराजा चेतना अभियान आदींबाबत तालुक्यातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा बुधवारी येथे घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ.नाईक बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ.संजय गरकल, गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहाय्यक वनसंरक्षक रमेश राठोड, तालुका कृषी अधिकारी पी.के. राठोड, निसर्गसंवादचे राजकुमार दिघडे उपस्थित होते.
येथील बचत भवनाच्या सभागृहाच्या आयोजित कार्यक्रमात आमदार नाईक म्हणाले, झाडे लावून त्याचे संगोपन करणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. तसेच बाराही महिने हिरवेगार राहतील अशा वृक्षांचे रोपण करण्यात यावे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून किमान १०० झाडे लावावी, असे आवाहन त्यांनी केले. वन विभागाने जंगलामध्ये जुन्याच खड्ड्यात नवे झाडे लावू नये, असा मार्मिक टोला ना.नाईक यांनी लगावला.
या प्रसंगी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तलाठी संतोष देशमुख, मनीषा पवार, नायब तहसीलदार देवानंद धबाले यांच्यासह तालुक्यातील महसूल, कृषी, वन, पंचायत समिती आदी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)