हायवेवरील खड्डे उठले जीवावर
By Admin | Updated: September 26, 2016 02:45 IST2016-09-26T02:45:29+5:302016-09-26T02:45:29+5:30
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते उमरखेड दरम्यान जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन चालविताना

हायवेवरील खड्डे उठले जीवावर
महागाव-उमरखेड रस्ता : अनेक अपघात, वाहनांचे नुकसान
संजय भगत महागाव
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते उमरखेड दरम्यान जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन चालविताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहे. दररोज अपघात होत असून वाहनही नादुरुस्त होत आहे. परंतु या रस्त्याच्या डागडुजीकडे कुणाचेही लक्ष नाही.
नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच हा रस्ता चौपदरी सिमेंटचा होणार आहे. परंतु हा रस्ता तयार होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत सध्या या रस्त्यावर प्रचंड मोठ्ठाले खड्डे पडले आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणावा की एखाद्या गावाचा पोचमार्ग म्हणावा, असा प्रश्न पडला आहे. महागावपासून पाच किलोमीटर अंतरावरील मुडाणा, निजधाम आश्रमासमोर भलामोठ्ठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. कित्येकांना अपंगत्व आले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. दुचाकी तर कसरत करून खड्ड्यातून बाहेर काढली जाते. परंतु चारचाकी वाहनांची फजिती होते. वाहनातील प्रवाशांचे होणारे हाल पाहून गावकरीही कासावीस होत आहे. समोर मोठ्ठा खड्डा आहे हे सांगण्यासाठी काही जण रस्त्याच्या बाजूने उभे असतात.
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा कारभार थेट वर्धा येथून हाकला जातो. केंद्र सरकारने चौपदरीकरणाचे काम हाती घेतले असून त्याचाच बागुलबुवा करून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे महागाव ते उमरखेड हा रस्ता पूर्णत: दुर्लक्षित झाला आहे. महागाव येथील पूस नदीवरील पूल एका बाजूने खचला आहे. नांदगव्हाण घाटातील रस्ता कडेने खचत आहे.