पिंपळदरीचा दिव्यांग घरकुलापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:03 IST2018-01-22T22:03:25+5:302018-01-22T22:03:59+5:30
शासन दरबारी आदर्श गाव म्हणून नोंद असलेला पिंपळदरीचा दिव्यांग व्यक्ती मात्र घरकुलापासून वंचित आहे.दोन्ही पाय निकामी झालेला हा तरुण चाकाच्या गाड्यावर बसून गावा-गावात भीक मागतो.

पिंपळदरीचा दिव्यांग घरकुलापासून वंचित
आॅनलाईन लोकमत
उमरखेड : शासन दरबारी आदर्श गाव म्हणून नोंद असलेला पिंपळदरीचा दिव्यांग व्यक्ती मात्र घरकुलापासून वंचित आहे.दोन्ही पाय निकामी झालेला हा तरुण चाकाच्या गाड्यावर बसून गावा-गावात भीक मागतो. मात्र अद्यापही त्याला घरकूल मिळाले नाही.
विठ्ठल राजाराम मासोळ असे या दिव्यांगाचे नाव आहे. निसर्गाने त्याच्यावर अन्याय केला. त्याचे दोन्ही पाय हिरावून घेतले. परंतु परिस्थितीपुढे हार न मानता तो चाक लावलेल्या गाड्यावर या गावातून त्या गावात भिक्षा मागतो. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अशा अवस्थेत तो आजही झोपडीवजा घरात राहतो. आपल्याला हक्काचे घरकुल मिळावे म्हणून तो धडपडत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर मिळावे म्हणून त्याने अर्ज केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
शासन दिव्यांग व्यक्तीला प्रत्येक श्रेणीत तीन टक्के सेस फंड देण्याची योजना आहे. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. आजही विठ्ठल बेघर असून लाकडी गाड्यावर तो या गावातून त्या गावात फिरत असतो. वरिष्ठांनी त्याला तात्काळ हक्काचे घर द्यावे अशी मागणी आहे.