बाभूळगावात पोलीस बंदोबस्तात पेट्रोल विक्री
By Admin | Updated: November 10, 2016 01:41 IST2016-11-10T01:41:37+5:302016-11-10T01:41:37+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट स्वीकारणे आज पूर्णत: टाळले गेले.

बाभूळगावात पोलीस बंदोबस्तात पेट्रोल विक्री
नोटा बंद : नागरिकांना विविध अडचणी
बाभूळगाव : पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट स्वीकारणे आज पूर्णत: टाळले गेले. या नोटांचा व्यवहार अपवादानेच झाला. पेट्रोलपंपावर या नोटा स्वीकारल्या जातील, असे जाहीर झाल्यानंतरही नाकारले गेल्याने पोलीस बंदोबस्तात पेट्रोल विक्री करावी लागली.
१०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला. कुठल्याही वस्तूसाठी ५०० रुपयांची नोट दिली जात होती. परंतु ही नोट स्वीकारण्याचे टाळले. याच बाबीचा अनुभव पेट्रोलपंपावर आला. किमान चारशे रुपयांचे पेट्रोल घेण्याची जणू सक्ती करण्यात आली. त्यामुळे वादाच्या किरकोळ घटना याठिकाणी घडल्या. अखेर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पंपावर दाखल होऊन पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली.
येथील बसस्थानकावरही वाहकांकडून ५०० रुपयांची नोट बंद झाल्याचे सांगून प्रवाशांना वेठीस धरण्यात आले. ऐवढेच नव्हे तर बसमधून खाली उतरविण्याचा प्रकारही घडला. पुढील प्रवासासाठी ५०० रुपयांची चिल्लर मिळावी यासाठी भटकणाऱ्यांना या नोटेचे ३०० रुपये देणारेही तेथे हजर असल्याने पिळवणुकीचे प्रकार घडले. हजार रुपयांच्या मोबदल्यात ७०० रुपये देण्याचा प्रकारही याठिकाणी काही भागात घडला. व्यवहार करताना नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले. काही व्यावसायीकांनी मात्र या नोटा स्विकारल्या. या निर्णयाविषयी समाधानही व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)