शिंगाडा पिकावर किडीचे आक्रमण
By Admin | Updated: April 10, 2015 00:15 IST2015-04-10T00:15:47+5:302015-04-10T00:15:47+5:30
येथील ब्रिटीशकालीन तलावातील शिंगाड्यावर अज्ञात किडीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे शिंगाडा उत्पादक चिंतेत सापडले आहे.

शिंगाडा पिकावर किडीचे आक्रमण
मुकुटबन : येथील ब्रिटीशकालीन तलावातील शिंगाड्यावर अज्ञात किडीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे शिंगाडा उत्पादक चिंतेत सापडले आहे.
शिंगाडा पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्यानंतर नऊ ते १० वेळा फवारणी करण्यात आल. मात्र ती कीड अद्यापही नियंत्रणात आली नाही. मार्च महिन्यात शिंगाडा पिकाचे तलावात बिजारोपण करण्यात आले. जून ते आॅगस्टपर्यंत शिंगाड्याचे चांगले पीक येते. आजूबाजूच्या परिसरात शिंगाड्याचे कोठेही उत्पन्न होत नसल्याने येथील शिंगाड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र अज्ञात किडीच्या आगमनामुळे शिंगाड्याचे पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे वेल तलावाबाहेर काढून त्याचे ढिग लावण्यात येत आहे. परिणामी तलाव परिसरात वेलीचे ढिग दिसून येत आहे.
त्याचबरोबर मासोळीचेही उत्पादन याच तलावात घेतले जाते. तथापि यावर्षी त्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळाल्याने मासोळी उत्पन्नात अद्याप पाहिजे तशी वाढ झाली नाही. या तलावातील उत्पन्नाच्या भरवशावर अनेक भोई बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र शिंगाडा व मासोळीच्या उत्पन्नात घट झाल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे.
मध्यंतरी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्याने तलावात सध्या बऱ्यापैकी पाणी आहे. याच परिसरात आठवडी बाजार व मच्छी मार्केट आहे. त्यामुळे शिंगाडा व मासोळी विक्रीसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र शिंगाडा पिकावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. पाण्यात नाव घेऊन शिंगाड्याची लागवड करणे, फवारणी करणे, शिंगाडा काढणे, त्याला मोठ्या कैचिने कापणे व नंतर गरम पाण्यात उकळून शिजविणे, या प्रक्रियेतून गेल्यानंतर शिंगाडा बाजारात येत असतो. (शहर प्रतिनिधी)