पारव्याचे आरोग्य केंद्रच आजारी
By Admin | Updated: August 19, 2014 23:59 IST2014-08-19T23:59:44+5:302014-08-19T23:59:44+5:30
घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अशी ओळख असलेल्या पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदांचा ज्वर चढला आहे. गेली काही महिन्यांपासून याठिकाणी नागरिकांना समाधानकारक

पारव्याचे आरोग्य केंद्रच आजारी
अब्दुल मतीन - पारवा
घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अशी ओळख असलेल्या पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदांचा ज्वर चढला आहे. गेली काही महिन्यांपासून याठिकाणी नागरिकांना समाधानकारक आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. योग्य उपचार होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
नागरिकांना गावापासून जवळच्या ठिकाणीच उपचार मिळावे यासाठी शासनाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश ठिकाणी याचा योग्य फायदा नागरिकांना होत नाही. पारवा आरोग्य केंद्राविषयी हीच परिस्थिती आहे. वैद्यकीय अधिकारी याशिवाय इतर महत्त्वाची पदे गेली अनेक वर्षांपासून रिक्त आहे. कार्यरत अत्यल्प कर्मचाऱ्यांवर आरोग्य सेवेचा भार वाहिला जातो. याशिवाय इतर अनेक समस्याही कार्यरत कर्मचारी आणि उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना भेडसावतात. जिल्ह्याची यंत्रणा मात्र काहीही गंभीर नसल्याचे दिसून येते.
परिसरातील ३३ हजार लोकसंख्येच्या आरोग्य सेवेसाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असली तरी केवळ एकाच्या भरवशावर आरोग्य सेवा पुरविली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यांच्या जागी अजूनही नवीन वैद्यकीय अधिकारी देण्यात आले नाही. आरोग्य सहायकाचे पुरुष आणि स्त्री ही दोनही पदे रिक्त आहेत. पुरुष आणि स्त्री हे आरोग्यसेवकही याठिकाणी नाही.
परिचरांची दोन पदे रिक्त आहेत. सफाई कामगार आवश्यक तेवढे नाही. वाहनचालकही नाही. या आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील २९ गावे येतात. जवळच्या ठिकाणी आणि तत्काळ उपचार मिळावे यासाठी लगबगीने आलेल्या रुग्णांची याठिकाणी घोर निराशा होते. डॉक्टर नसल्याचे कारण सांगून इतर ठिकाणी हलविण्याचा सल्ला उपस्थित कर्मचाऱ्यांकडूनच दिला जातो. याशिवाय याठिकाणी प्रसूतीचाही प्रश्न आहे. महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेक रुग्ण खासगीत जात असल्याची माहिती आहे.