पैनगंगा कोरडी ठण्ण
By Admin | Updated: May 3, 2015 00:07 IST2015-05-03T00:07:40+5:302015-05-03T00:07:40+5:30
पुसद आणि उमरखेड तालुक्यात भीषण जलसंकट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उभे ठाकले असून ..

पैनगंगा कोरडी ठण्ण
पुसद/उमरखेड : पुसद आणि उमरखेड तालुक्यात भीषण जलसंकट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उभे ठाकले असून पैनगंगा नदी तीरावरील ४५ गावात पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. तर पुसद तालुक्यातील आठ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दरवर्षी तिच ती गावे पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात दिसत असून पंचायत समितीचा कृती आराखडा कागदोपत्री राबविला जात असल्याचा आरोप होत आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे.
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या ४५ गावांना पावसाळ्यात पुराचा आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या पैनगंगेचे पात्र आटल्याने ४५ गावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वच जण पाण्यासाठी पायपीट करताना दिसून येतात. तालुक्यातील मार्लेगाव, संगम चिंचोली, तिवडी, टाकळी, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, ढाणकी, सावळेश्वर, बिटरगाव, मुरली, जेवली, परोटी वन, थेरडी, पेंदा, सोनदाबी, सोईट यासह अनेक गावात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
नदीवरूनच अनेक गावात पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा होतो. नदीत पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहे. पाण्याचे हांडे घेवून एक एक किलोमीटर अंतर पार करावे लागते. इसापूर धरणातून पाणी सोडले तर नदीतरावरील गावातील पाण्याचा प्रश्न संपुष्टात येवू शकतो. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडावे, यासाठी नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. परंतु कोणीही ठोस कार्यवाही केली नाही. उमरखेड तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पद्मश्री कृषी परिषद उमरखेडच्या मार्फत निवेदन देण्यात आले. धरणातील सहा दलघमी पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी करण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष चक्रधर देवसरकर, राजेश्वर वानखेडे, गजानन देवरामे, कृष्णा देवसरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पुसद तालुक्यातील आठ गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात १८० गावे असून ११९ ग्रामपंचायती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पाणी अडवा, पाणी जिरवा हा मंत्र देणाऱ्या पुसद तालुक्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अनसिंग, उल्हासवाडी, उपनवाडी, बाळवाडी, म्हैसमाळ, कारलादेव, मारवाडी खु, वडसद आदी गाठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. या गावांना सात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर पूस धरणालगतच्या मरसूळ, चिखली, वडगाव आदी गावातही पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. येथील महिलांनी नुकताच घागर मोर्चा काढून निषेध केला होता.
पुसद तालुक्यात तिच ती गावे दरवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असतात. पंचायत समितीकडून दरवर्षी लाखो रुपयांचा कृती आराखडा तयार केला जातो. मात्र त्याच गावात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही पाणीटंचाई निवारणार्थ ठोस उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
पैनगंगा कोरडी ठण्ण
उमरखेड तालुक्याची जीवनदायी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यात कोरडी पडली आहे. तेव्हापासून एकदाच या नदीपात्रात धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाणीच सोडण्यात आले नाही. परिणामी नदी तीरावरील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून माणसासोबतच जनावरांना फटका बसत आहे. आता नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहे.
ढाणकीत महिन्यातून दोन दिवस नळ
उमरखेड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या ढाणकी येथे पाणीप्रश्न बिकट झाला आहे. पैनगंगा कोरडी पडल्याचा फटका या गावाला बसत असून महिन्यातून केवळ दोन दिवस नळ येतात. महिला पाण्यासाठी त्रस्त झाल्या आहे. २९ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर नागरिकांनी धडक दिली. १५ दिवसातून एकदा नळ येत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहे.
माणसांसोबत
जनावरांचे हाल
उमरखेड आणि पुसद तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचा फटका माणसांसोबतच जनावरांना बसत आहे. माणूस कुठूनही पाणी उपलब्ध करू शकतो. परंतु जनावरांचे तसे होत नाही. नदी, नाले आणि विहिरीही आटल्याने जनावरांना पाणी कोठे पाजावे, असा प्रश्न गोपालकांना पडला आहे. अनेकांनी तर जनावरे विकण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसत आहे.