वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांनाच दंड !

By Admin | Updated: September 8, 2016 01:07 IST2016-09-08T01:07:41+5:302016-09-08T01:07:41+5:30

शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातच नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही.

Penalties for police in violation of traffic rules! | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांनाच दंड !

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांनाच दंड !

एसपी कार्यालयासमोर कारवाई : सहायक पोलीस निरीक्षक, फौजदाराचाही समावेश
यवतमाळ : शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातच नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. याची प्रचिती वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईतून मंगळवारी आली. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वाहतूक शाखेने विना हेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चक्क दंड ठोठावला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षक व फौजदाराचाही समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण पुरविणे आणि कायद्याची अंमलबजावणी होते की नाही, हे बघण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. त्यामुळे कोणताही नवीन कायदा राबविताना सर्वप्रथम पोलिसांना त्याचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा असते. कायद्याचे रक्षक म्हणूनच समाजात त्यांचा वावर असतो. ती जबाबदारी स्वीकारून वावरणे आवश्यक आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून दुचाकी चालकांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. हा कायदा राबविण्याची विडा जिल्हा वाहतूक शाखेने उचलला आहे. हेल्मेट सक्ती करण्यासाठी वाहतूक शाखेने सर्वप्रथम पोलीस दलापासूनच सुरूवात केली आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजता वाहतूक शाखेचे निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी पथकासह विदाऊट हेल्मेट येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना दंड ठोठावणे सुरू केले. काहींनी चूक मान्य करून निमूटपणे दंड भरला तर काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र दंड होणार म्हणजे होणार अशी भूमिका असल्याने सर्वांचाच नाईलाज झाला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच कारवाई होत असल्याने अनेकांनी आपला मार्ग बदलून ऐन वेळेवर पायदळ कार्यालय गाठले. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षक आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह २० जणांना प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे दंड ठोठावण्यात आला.
वाहतूक शाखेच्या कारवाईने पहिल्यांदाच पोलीस पोलिसांनाच धास्तावलेले दिसत होते. अनेकांनी अडगळीत ठेवलेले हेल्मेट पुन्हा डोक्यावर चढविले. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. तो मोडणाऱ्या कोणाचही गय केली जाणार नाही. याच पध्दतीने इतरही शासकीय कार्यालयासमोर मोहीम राबविणार असल्याचे निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Penalties for police in violation of traffic rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.