उत्तम पीक परिस्थितीवर पैसेवारीचीही मोहोर

By Admin | Updated: October 3, 2015 02:13 IST2015-10-03T02:13:21+5:302015-10-03T02:13:21+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील खरिपाची नजरअंदाज पीक पैसेवारी सरासरी ६३ पैसे एवढी नोंदविण्यात आली आहे.

Peal of Peacock on Best Peak Conditions | उत्तम पीक परिस्थितीवर पैसेवारीचीही मोहोर

उत्तम पीक परिस्थितीवर पैसेवारीचीही मोहोर

२ हजार ५३ गावे : जिल्ह्याची नजरपैसेवारी ६३ पैसे
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील खरिपाची नजरअंदाज पीक पैसेवारी सरासरी ६३ पैसे एवढी नोंदविण्यात आली आहे. २ हजार ५३ गावातील पीक पैसेवारीचा हा अहवाल ३० सप्टेंबर रोजी महसूल विभागाने जारी केला आहे.
जिल्ह्याची सरासरी पीक पैसेवारी ५० पैशाच्यावर ६३ पैसे एवढी निघाली. सर्वाधिक ७० पैसे मारेगाव तर सर्वात कमी ५७ पैसे उमरखेड तालुक्याची नजर पीक पैसेवारी नोंदविली गेली. जिल्ह्यात एकूण दोन हजार १५८ गावे आहेत. त्यातील दोन हजार ५३ गावातील क्षेत्र लागवडी योग्य आहे. जिल्ह्याची सरासरी पीक पैसेवारी (६३ पैसे) पाहता पीक परिस्थिती उत्तम व समाधानकारक असल्याचे दिसून येते. यंदाचा खरीप हंगाम खरोखरच चांगला असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकांकडून सांगितले जात आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, पीकेव्हीचे संशोधक, तज्ज्ञ शेतकरी आदी सर्वच जण पीक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगत आहे. खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही या समाधानकारक पीक परिस्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यातच नजर पीक पैसेवारी ६३ पैसे निघाल्याने पिकाच्या चांगल्या असलेल्या परिस्थितीवर आणखी मोहर उमटली आहे.
त्यातही कपाशीचे पीक समाधानकारक असल्याचे दिसून येते. त्याची सरासरी ६३ पैसे एवढी निघाली आहे.
सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग याचीही स्थिती चांगली असल्याचे महसूल विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते.
यंदाची खरीप पीक पैसेवारीसुद्धा ब्रिटीशकालीन पद्धतीनुसारच काढली गेली. मुळात या पद्धतीला शेतकरी व त्यांच्यासाठी लढणाऱ्या शेतकरी नेत्यांचा विरोध होता. ५० टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्याच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे ब्रिटीशकालीन समीकरण आहे. मात्र हे समीकरण बदलविण्याचा विचार शासन स्तरावर सुरू होता. त्यासाठी ५० पैशाऐवजी ६७ पैसे हा पीक परिस्थितीच्या चांगल्या-वाईट अवस्थेचा निकष ठरविला गेला. मात्र राज्यात बहुतांश ठिकाणी पीक पैसेवारी ६७ पैशापेक्षा कमी आली. ते पाहता संपूर्ण राज्यातच टंचाई सदृश स्थिती जाहीर करावी लागेल व त्या अनुषंगाने शेतकरी-नागरिकांना सारामाफी, करमाफी, व्याज माफी द्यावी लागेल याची जाणीव सरकारला झाली. म्हणूनच सरकारने यावर्षी पुन्हा पैसेवारीसाठी ब्रिटीशकालीन ५० टक्क्याच्या निकषाचीच पद्धत अवलंबिण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसातच ६७ पैशाचा आदेश रद्द करून पुन्हा ५० पैसे कायम ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)

वणी तालुक्यातील दोन गावांची पैसेवारी कमी
संपूर्ण जिल्ह्यात पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे पैसेवारीच्या नोंदींवरून दिसून येत असले तरी वणी तालुक्यातील दोन गावांची पैेसेवारी मात्र ५० पैशापेक्षा कमी निघाली आहे. त्यामध्ये जुगाद व कोलगावचा समावेश आहे. अर्थात तेथील पीक परिस्थिती चांगली नसल्याचे महसुली नोंदींवरुन दिसून येते.

Web Title: Peal of Peacock on Best Peak Conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.