राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजासह पीककर्ज वसुली
By Admin | Updated: May 20, 2015 00:17 IST2015-05-20T00:17:53+5:302015-05-20T00:17:53+5:30
अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे.

राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजासह पीककर्ज वसुली
व्याजमाफीला हरताळ : शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत
हिवरी : अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला असून अशाही स्थितीत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची व्याजासह वसुली सुरू केली आहे. राज्य शासनाच्या व्याजमाफीच्या धोरणाला या बँकांनी हरताळ फसला आहे. राज्य शासनाने एक लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून संपूर्ण व्याजाची वसुली केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनियमिततेचा जबर फटका बसला आहे. खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. वाचलेल्या पिकात जेमतेम लागवड खर्च शेतकऱ्यांच्या हाती आला. यावर्षी कापसाचा हंगाम तर अवघ्या चार महिन्यातच संपला. सोयाबीन आणि तूर या पिकांचीही अतिशय दयनीय स्थिती होती. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी शेतमालाचे भाव अतिशय कमी केले होते. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेपोटी बाजारभाव मिळत नसतानाही माल विकण्यास भाग पाडण्यात आले. आता शेतकऱ्याच्या घरात कापसाचे बोंड नसताना, सोयाबीनचा दाणा नसताना या दोन्ही मालाचे बाजारभाव दुपटीने वाढले आहे. एकंदरच बाजारपेठेतील उलाढालीतून थेट व्यापारी मालामाल झाले आहे. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. अशाच आर्थिक संकटाच्या काळात शासनाकडून केलेली व्याजमाफी ही केवळ पोकळ घोषणा म्हणून राहिली आहे. पुढील हंगामासाठी पीककर्ज मंजूर करताना राष्ट्रीयकृत बँकांनी मागील वर्षीच्या पीककर्जाची व्याजासह वसुली केली आहे. आता तर काही शेतकऱ्यांपुढे थकीत कर्जाची रक्कम भरण्याची सोय उरली नाही. पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून काही प्रमाणात शेतकऱ्यांना व्याजमाफीचा दिलासा देण्यात आला. मात्र राष्ट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येते.
कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवायला लागला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते या सर्वांची निकड भागविण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. (वार्ताहर)
खरिपाची लगबग
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी खरिपाच्या पेरणीची तयारी करीत आहे. शेतीच्या मशागतीची कामे माघारली असून त्यातच मान्सून धडकल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे आता शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बी-बियाण्यातून तजविजीकडे दुर्लक्ष आहे.