उपग्रहाच्या मदतीने पीक पैसेवारी
By Admin | Updated: November 4, 2015 02:46 IST2015-11-04T02:46:25+5:302015-11-04T02:46:25+5:30
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पीक पैसेवारी काढण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

उपग्रहाच्या मदतीने पीक पैसेवारी
रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली पीक पैसेवारी काढण्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. सॅटेलाईटच्या मदतीने पिकांची पाहणी करून पैसेवारी जाहीर होणार आहे. तसेच पैसेवारी जाहीर करण्याच्या परंपरागत तारखा बदलविण्यात आल्या आहेत.
पैसेवारी काढण्यासाठी ब्रिटिशकालीन तक्त्यांचा वापर होत होता. यामुळे दुष्काळी स्थिती असली तरी दुष्काळ जाहीर होत नव्हता. १८८४, १९२७ आणि १९४४ यावर्षी पुर्वीच्या मुंबई राज्यातील सर्व प्रमुख पिकांच्या समाधानकारक उत्पन्नाचे तक्ते कृषी विभागाने बनविले होते. या तक्त्यांची पिकांच्या उत्पन्नाशी तुलना करून आणेवारी काढली जात होती. १९६२ साली व्ही. एन. जोशी समिती, १९७१ मध्ये व्ही. एम. दांडेकर समिती, १९८४ मध्ये भगवंत गायकवाड समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात आली.
यानंतरही तक्रारी कायम होत्या. यामुळे राज्य शासनाने यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. नवी पीक पैसेवारीची पद्धती घोषित करण्यात आली. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये सॅटेलाईटच्या मदतीने पिकांचे फोटो घेतले जाणार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे.
पैसेवारी जाहीर करण्याच्या परंपरागत तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समान तारखा ठरविण्यात आल्या आहेत. पूर्वी अमरावती विभागात १५ जानेवारी रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत होती. आता ३१ डिसेंबरलाच अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी, ३१ आॅक्टोबरला सुधारित पैसेवारी आणि ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत.
अशी काढणार पैसेवारी
४पैसेवारी जाहीर करण्यासाठी १०० गुणिला पाहणी केलेले हेक्टरी उत्पादन भागीला प्रमाण उत्पादन असे सूत्र राहणार आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष आहे. यामध्ये जून ते जुलै महिन्यात एकूण सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान , संपूर्ण मान्सून कालवधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान, संपूर्ण मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ पर्जन्यमानात खंड राहील्यास पिकावर त्याचा विपरित परिणाम झाल्यास दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात येणार आहे.