मित्राच्या मारेकऱ्याला मंगळवारपर्यंत पीसीआर
By Admin | Updated: January 8, 2017 01:05 IST2017-01-08T01:05:57+5:302017-01-08T01:05:57+5:30
तालुक्यातील मोख क्र.२ येथे गवंडी काम करणाऱ्या मित्राचा चाकूने खून केल्याची घटना ६ जानेवारीला उघडकीस आली होती.

मित्राच्या मारेकऱ्याला मंगळवारपर्यंत पीसीआर
मोखचे खून प्रकरण : घटनास्थळावरून कपडे आणि चाकू जप्त
दिग्रस : तालुक्यातील मोख क्र.२ येथे गवंडी काम करणाऱ्या मित्राचा चाकूने खून केल्याची घटना ६ जानेवारीला उघडकीस आली होती. शनिवारी आरोपीचा कबुली जवाब घेवून दिग्रस पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
आरोपी कैलास भगत याने आपला मित्र समाधान श्रीराम भगत याला गुरुवारी रात्री दारू पिण्यास नेले. परत येताना त्यांच्यात वाद होवून कैलास रस्त्यावर पडला. आपल्या परिवाराला समाधानने अपशब्द बोलल्याचा राग मनात ठेवून कैलासने त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात घटनास्थळावरच समाधानचा मृत्यू झाला. ही बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. संशयावरून पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले. बऱ्याच वेळानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी त्याचा कबुली जवाब घेवून पोलिसांनी मोख क्र.२ येथील घटनास्थळ गाठले. तेथे पोहोचल्यावर आरोपीने परिसरात लपवलेले रक्ताळलेले कपडे व हत्त्येकरिता वापरलेला चाकू काढून दिला. आरोपीने शासकीय पंचांच्या समक्ष हत्त्येचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
आरोपी कैलासला दुपारी दिग्रस न्यायालयात नेण्यात आले. हत्त्येच्या वेळी त्याला कोणी मदत केली का, कोणी सहकारी होते का या तपासाकरिता न्यायालयाने आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात तपास करून पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, हेड कॉन्स्टेबल नारायण पवार, कॉन्स्टेबल दत्ता पवार, रूपेश चव्हाण यांनी कारवाई केली. (प्रतिनिधी)