पुसद नगरपरिषदेत सभापतींची निवड अविरोध
By Admin | Updated: December 20, 2014 02:14 IST2014-12-20T02:14:45+5:302014-12-20T02:14:45+5:30
पुसद नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. काँग्रेसकडे बांधकाम, नियोजन, महिला व बालकल्याण समितीचे ...

पुसद नगरपरिषदेत सभापतींची निवड अविरोध
पुसद : पुसद नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. काँग्रेसकडे बांधकाम, नियोजन, महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद तर राष्ट्रवादीकडे शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद देण्यात आले. सर्व समित्यांसाठी प्रत्येकी एक-एक नामांकन आल्याने सभापतींची निवड अविरोध करण्यात आली.
नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. विषय समित्या ठरविताना काँग्रेसचे गटनेते डॉ. मोहंमद नदीम, राष्ट्रवादीचे गटनेते डॉ.अकील मेमन, शिवसेनेचे गटनेते अॅड. उमाकांत पापीनवार आदींनी विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन केले. ठरल्याप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादीने सभापतीपदी वाटून घेतले. बांधकाम समित्याच्या सभापतीपदी काँग्रेसचे जकी अनवर, नियोजन समितीच्या सभापतीपदी डॉ. मो.नदीम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मीराबाई साहू तर शिक्षण सभापतीपदी राष्ट्रवादीचे नामदेव फाटे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे तर आरोग्य सभापतीपदी अॅड. भारत जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, सहायक निवडणूक अधिकारी प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण मानकर आणि सहायक म्हणून प्रशासन अधिकारी उत्तम डुकरे यांनी काम पाहिले.
पुसद नगरपरिषदेच्या सभापतींच्या निवडीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद परिसरात फटाके फोडून एकच जल्लोष केला. पीठासीन अधिकारी चंद्रकांत जाजू यांनी बोलाविलेल्या नगरसेवकांच्या विशेष सभेला २० नगरसेवक हजर तर ११ नगरसेवक गैरहजर राहिल्याने चर्चेचे पेव फुटले होते. दरम्यान विषय समितींच्या सभापतीच्या निवडणुकीत सर्व सहा समित्यांच्या सभापतीसाठी प्रत्येकी एक नामांकन आल्याने निवड अविरोध करण्यात आली. मात्र उपसभापतीपदासाठी कुणीही नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे उपभापतीपद रिक्त राहिल्याचे पीठासीन अधिकारी चंद्रकांत जाजू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)