‘अहिंसा परमोधर्म’च्या घोषणांनी पुसद दुमदुमले
By Admin | Updated: April 20, 2016 02:34 IST2016-04-20T02:34:28+5:302016-04-20T02:34:28+5:30
अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी पुसद शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

‘अहिंसा परमोधर्म’च्या घोषणांनी पुसद दुमदुमले
पुसद : अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी पुसद शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान महावीर जयंती उत्सव समिती व जैन मंदिर संस्थानच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली.
आत्मवाद, रत्नत्रयवाद, वस्तू स्वातंत्र्यवाद, अहिंसावाद, अपरिग्रहवाद, अनेकांतवाद, सर्वोदयवाद आदी लोककल्याणकारक सिद्धांतांचा पुरस्कार करणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६१५ वी जयंती धुमधडाक्यात साजरी झाली. जयंतीनिमित्त येथील चौबारा चौकातील जैन मंदिरापासून सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी पुरुष व महिला मंडळींनी अहिंसा परमोधर्म की जय, भगवान महावीर की जय आदी घोषणा दिल्या. या शोभायात्रेत ट्रॅक्टर व रिक्षावर भगवान महावीरांच्या मोठमोठ्या प्रतीमा ठेवलेल्या होत्या. ढोलताशांच्या गजरासह मिरवणुकीत विविध झाँक्या व महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधत होते.
यावेळी भगवान महावीर की जय, अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणला. ही शोभायात्रा जैन मंदिर, गुजरी चौक, आझाद चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, कापड लाईन, नगिना चौक, देवकृपा चौक, चौबारा चौक मार्गे वाजतगाजत काढण्यात आली. जैन मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. शोभायात्रेतील सहभागी जैन महिला भगिनी व पुरुष बांधवांसाठी भाजप शहराध्यक्ष भारत पाटील, रश्मी पानपट्टे, शिवाजी पवार आदींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तर शिवसेनेचे नगरसेवक अॅड. उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख विकास जामकर, अवि बहादुरे, मधुकर कलिंदर, परेश देशमुख आदींनी सुभाष चौकात शोभायात्रेचे स्वागत केले.
शोभायात्रेच्या मार्गात धर्मा रुणवाल व अरुण वायकोस मित्र मंडळांनी भाविकांसाठी फराळ व ज्यूसची व्यवस्था केली होती. पुसद शहरचे ठाणेदार अनिल कुरळकर, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक विशाल बहात्तरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. यशस्वीतेसाठी जैन संस्थानचे अध्यक्ष किशोर आहाळे, जितेंद्र रोकडे, संदीप आहाळे, प्रा. सुरेंद्र आहाळे, भारत सोनटक्के, राका आहाळे, हिरा कान्हेड, अॅड. पवनकुमार जैन, अनुप नरसिंग, अण्णा आहाळे, अरुण वायकोस, अशोक वरवंटे, राजू वाळके, बंडू संगई, विलास नेटके, राजकुमार कान्हेड, अनिल आहाळे, भाऊ गोरे, निता गोरे, अल्पना मोहेकार आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)