पुसदमध्ये दमदार पाऊस
By Admin | Updated: June 11, 2016 02:53 IST2016-06-11T02:53:14+5:302016-06-11T02:53:14+5:30
बहुप्रतिक्षीत पावसाचे पुसद तालुक्यात गुरुवारी रात्री दमदार आगमन झाले. मान्सूनपूर्व पावसाने नदी-नाले खळखळून वाहू लागले असून

पुसदमध्ये दमदार पाऊस
३७ मि.मी. पाऊस : पूस नदी खळखळून वाहू लागली, शेतकरी आनंदला
पुसद : बहुप्रतिक्षीत पावसाचे पुसद तालुक्यात गुरुवारी रात्री दमदार आगमन झाले. मान्सूनपूर्व पावसाने नदी-नाले खळखळून वाहू लागले असून गत दोन महिन्यांपासून कोरड्या पडलेले पूस नदीचे पात्र शुक्रवारी दुथडी भरुन वाहतानाचे दृश्य पाहून पुसदकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरात ३७ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.
गत दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पुसदकरांना गुरुवारी रात्री बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच दिलासा दिला. पुसद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात अवघे एक टक्का पाणी होते. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरू आहे. पुसद तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीही सुरू केली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत ३७ मिमी पाऊस कोसळल्याचे नोंद तहसील प्रशासनाने घेतली आहे. तालुक्यातील जनुना गावाला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून काहींची घरे कोसळली आहे. तर अंगावर दगड पडल्याने दोन महिलाही जखमी झाल्या.
पाण्याचा थेंबही नसलेल्या पूस नदीचे पात्र आता खळखळून वाहू लागले. त्यामुळे पुसद शहरासह आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी झाला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरणाची कामे झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. आता मान्सूनपूर्व पाऊस बरसत असला तरी केरळपर्यंत मान्सून आल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहे. पुसद शहरातील कृषी केंद्रात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. तसेच मान्सूनपूर्व कामांची लगबग वाढली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली असून आता धो-धो पावसाची तेवढी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. लवकरच दमदार पाऊस बरसेल अशी चिन्हे वातावरणात दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)