बोगस डॉक्टरांच्या हाती रुग्णांची नाडी
By Admin | Updated: August 3, 2014 23:39 IST2014-08-03T23:39:08+5:302014-08-03T23:39:08+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे

बोगस डॉक्टरांच्या हाती रुग्णांची नाडी
प्रकाश सातघरे - दिग्रस
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे संभाषण कौशल्य हीच त्यांची पदवी. मात्र या प्रकारात गोरगरीब जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. दिग्रस तालुक्यात गावागावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात आजही पाहिजे तशी आरोग्य सेवा पोहोचली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र केवळ नावापुरतेच आहे. रात्री-बे-रात्री कुणी आजारी पडल्यास या ठिकाणी डॉक्टर भेटत नाही. परिणामी शहराकडे धाव घ्यावी लागते. अनेकांची शहरापर्यंत जाण्याची परिस्थिती नसते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जातो. साधा निरोप आला की डॉक्टर घरपोच आरोग्य सेवा द्यायला तयार होतो. आजार कोणता झाला, नेमके काय होत आहे याची जुजबी चौकशी आटोपली की सरळ सलाईन लावली जाते. कोणतेही ज्ञान नसताना रुग्णावर उपचार केले जाते. भरमसाठ औषधी दिली जाते. विशेष म्हणजे या डॉक्टरांजवळच लागणारी औषधी उपलब्ध असते. त्याचवेळी रुग्णाला औषधी विकत दिली जाते.
काही गावात तर डॉक्टरांंनी दवाखाने थाटले आहे. यामध्ये बंगाली डॉक्टरांचा समावेश आहे. तर काही डॉक्टर गावागावात फिरुन आपली वैद्यकीय सेवा देत आहे. बोगस डॉक्टरांच्या औषधोपचाराने काही रुग्णांवर विपरित परिणाम होत आहे. अनावश्यक औषधी शरीरात गेल्याने त्याचे परिणाम रुग्णांवर दिसून येतात. मात्र नाईलाजाने गोरगरिबांना या डॉक्टरांच्या हातूनच उपचार करावा लागतो. एखाद्या गावात विरोध झाला तर गावातील इतर लोकांना विश्वासात घेऊन डॉक्टर त्याच ठिकाणी प्रकरण निस्तारतात. मात्र हा डॉक्टर खरा की खोटा हे मात्र कुणीही पाहत नाही.
बोगस डॉक्टरांवर नियंत्रण आणि त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. मात्र जिल्हा पातळीवरच दखल घेतली जात नसल्याने गाव पातळीवर जाऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची तपासणीच करीत नाही. वरुन काही आदेश आला की, जुजबी कारवाई केली जाते. या सर्व प्रकारात बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत असून नागरिकांना मात्र मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.