काळोखात लक्ष्याने शोधला अर्थार्जनाचा मार्ग
By Admin | Updated: January 1, 2017 02:21 IST2017-01-01T02:21:23+5:302017-01-01T02:21:23+5:30
रोजगाराच्या शोधात गावातून शहरात आलेला युवक परिस्थितीने गुन्हेगारीकडे वळतो.

काळोखात लक्ष्याने शोधला अर्थार्जनाचा मार्ग
रोजगाराच्या शोधात गावातून शहरात आलेला युवक परिस्थितीने गुन्हेगारीकडे वळतो. त्याने चोऱ्या करणे हेच आपल्या अर्थार्जनाचे साधन बनविले. उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताच रोजगाराचा मार्ग उपलब्धच नाही. अशा पद्धतीने लक्ष्या आपल्या घरफोडीच्या कामात व्यस्त असतो. बाहेर असले की बंद घरे हेरणे, मिळेल त्या वस्तू चोरणे, पोलिसांच्या हाती लागल्यानंतर कारागृहात जाणे असा नित्यक्रमच लक्ष्याने बनविला आहे. त्याच्या या शैलीमुळे घराला कुलूप लावताना मात्र सर्वसामान्यांना धडकी भरते. आतापर्यंत लक्ष्याने २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची मुद्देमालासहीत कबुली दिली आहे.
चोरट्यांच्या जगतात आर्णी तालुक्यातील भांबोरा येथून आलेल्या लक्ष्मण मनोज जाधव (२७) याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लक्ष्या या टोपण नावाने परिचित असून केवळ बंद घरांना त्याने आपले लक्ष्य केले आहे. पोलिसांना सातत्याने व्यस्त ठेवण्याचे काम लक्ष्याकडून केले जाते. आतापर्यंत यवतमाळातील शहर पोलीस स्टेशन, वडगाव रोड पोलीस स्टेशन आणि लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष्यावर चोरीचे व घरफोडीचे २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. हा लक्ष्या कुख्यात घरफोड्या असला तरी त्याची पार्श्वभूमी मात्र अतिशय हालाखीची व समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारी आहे.
त्याचे वडील मनोज जाधव यांचे निधन झाले. त्यानंतर विधवा आईने लक्ष्याचा सांभाळ केला. रोजमजुरी करून मुलाच्या भविष्यासाठी ही माऊली धडपडत होती. मात्र यात मुलाला पुरेसा वेळ देता आला नाही. परिणामी व्हायचे तेच झाले. लहानपणापासूनच लक्ष्याची संगत चुकीच्या मित्रांसोबत लागली. गावात लक्ष्याला कामधंदा मिळत नसल्याने त्याने रोजगाराच्या शोधात यवतमाळ गाठले. इथेही त्याला नेताजीनगर झोपडपट्टीत आश्रय मिळाला. यामुळे लक्ष्यातील अवगुणांना चालना मिळाली. अन् त्याने शहरात घरफोडींचा धडाका सुरू केला. काही झाले तरी मिळेल ती वस्तू चोरायची, विकायची आणि आपल्या गरजा व शौक पूर्ण करायचे, इतकच त्याचं आयुष्य बनलं. चोरीसाठी लक्ष्या कधीच कुणाला सोबत घेत नव्हता. त्याने आतापर्यंत २० पेक्षा अधिक घरांचे कुलूप तोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. मात्र या लक्ष्याला चोरीतही चांगल्या कंपनीचा एलसीडी टीव्ही चोरण्यात विशेष रस असल्याचे पोलीस तपासात दिसून आले.
लक्ष्या हा सातत्याने तुरुंगात आत-बाहेर करत असतो. मात्र आपल्या चोरीच्या प्लॅनमध्ये तो कोणालाच सोबत घेत नाही. त्यामुळे त्याच्या हालचालींची खबर सहसा पोलिसांच्या फंटरलासुद्धा मिळत नाही. यामुळे मध्यंतरीच्या काळात घरफोडीचे सत्रच सुरू होते. टोळीविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला हटकल्यावरून लक्ष्याच्या कारवायांचा भांडाफोड झाला.संशयित अक्षय दयाराम मसराम (२२) रा.नेताजीनगर याच्याकडे महागडी दुचाकी आढळून आली. या दुचाकीबाबत पोलिसांनी विचारणा करताच तो गडबडला अन् पुढच्या दोन लाख २० हजाराच्या चोरीचा धागा हाती लागला. पहिल्यांदाच लक्ष्याने अक्षयला सोबत घेवून घरफोड्या केल्या. त्याने दुचाकी चोरण्यासाठी सिंघानियानगरातील दोन बंदघराचे कुलूप तोडून दुचाकीची चावी घेतली आणि पोबारा केला, तर गजानननगरीमध्ये घराचे कुलूप तोडून लक्ष्याने त्याला नेहमीच आवडणारा आकाराने मोठ्ठा असा एलसीडी टीव्ही चोरून नेला. लक्ष्याने एवढा मोठा टीव्ही काढून नेला. मात्र तो टीव्ही नेताना कुणालाही दिसला नाही, हे विशेष.
रात्रगस्त आणि पहाटेच्या सुमाराससुद्धा वर्दळ असूनसुद्धा लक्ष्यावर कुणाची नजर पडली नाही. चोरीचा टीव्ही त्याने रात्रभर गाजर गवताच्या झुडपात लवपून ठेवला. नंतर आपल्या झोपडीवजा घरात आणला. लक्ष्याकडून आतापर्यंत दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. सप्टेंबर महिन्यात कारागृहातून बाहेर पडलेल्या लक्ष्याने पुन्हा नोव्हेंबर महिन्यापर्यंत तीन ते चार घरात चोरी केल्याची कबुली दिली.
टोळीविरोधी पथकातील सहायक निरीक्षक प्रशांत गीते, उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघन, विनोद राठोड, बंडू मेश्राम, अमोल चौधरी यांनी लक्ष्याला आर्णीतून जेरबंद केले आहे.