लोहारा उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित
By Admin | Updated: November 8, 2014 22:44 IST2014-11-08T22:44:22+5:302014-11-08T22:44:22+5:30
शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लोहारा येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर ८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले.

लोहारा उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित
यवतमाळ : शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लोहारा येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर ८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. एक विरुद्ध पंधरा अशा बहुमताने हा प्रस्ताव पारित झाल्याने उपसरपंचाला पायउतार व्हावे लागले.
लोहारा येथील उपसरपंच फिरोज खान मजिद खान पठाण यांच्या विरोधात तहसीलदार अनुप खांडे यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव सात सदस्यांनी दाखल केला. मनकर्णा जाधव यांच्यासह सात जणांनी हा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयातच मतदान घेण्यात आले. यामध्ये केवळ एक मत अविश्वास प्रस्तावाविरोधात पडले. तर एक सदस्य या सभेला गैरहजर होता. सरपंचासह उर्वरित १५ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. यावेळी तहसीलदार अनुप खांडे, ग्रामसेवक प्रशांत कांडलकर उपस्थित होते. ठराव पारित झाल्याने फिरोज खान पठाण यांना तत्काळ पदावरून पायउतार व्हावे लागले. आता उपसरपंचपदी कुणाची वर्णी लागते, याची उत्सुकता लागली आहे. अद्याप उपसरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित नसला तरी त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी सुरू आहे. लोहारा ग्रामपंचायतीत शहरालगत असल्याने स्थानिक दिग्गज नेत्यांचा येथील घडामोडींमध्ये सातत्याने सहभाग असतो. या ग्रामपंचायतीतील मोठा गट आपल्या बाजूने कसा राहील, आपला प्रभाव या क्षेत्रात कायम राहावा यासाठी नेतेमंडळींचा हस्तक्षेप असतो. त्या दृष्टिकोनातून अविश्वास ठरावाची प्रक्रिया राजकीय पटलावर मोठी खेळी मानली जाते. (कार्यालय प्रतिनिधी)