ग्रामपंचायत रणकंदनात पक्ष सक्रिय
By Admin | Updated: February 23, 2015 00:10 IST2015-02-23T00:10:05+5:302015-02-23T00:10:05+5:30
पंचायतराज व्यवस्थेची पहिली कडी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. तब्बल ४६८ ग्रामपंचातींच्या निवडणुका घेण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ...

ग्रामपंचायत रणकंदनात पक्ष सक्रिय
यवतमाळ : पंचायतराज व्यवस्थेची पहिली कडी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. तब्बल ४६८ ग्रामपंचातींच्या निवडणुका घेण्यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच निवडणुकींच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी धडपडत असलेल्या भाजप व शिवसेनेने व्युव्हरचना आखली आहे. वार्ड फॉरमेशनच्या आक्षेपापासून सर्वच गोष्टींवर स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांचे बारीक लक्ष आहे. ऐरवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून स्वत:ला अलिप्त ठेवणाऱ्या जिल्हा व तालुक्यातील नेत्यांनी रस घ्यायला सुरूवात केली आहे. प्रथमच ग्रामपंचायतीच्या रणकंदात राजकीय पक्ष सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रील-मे महिन्यात ४६८ तर दुसऱ्या टप्प्यात जुलै ते डिसेंबर महिन्यात ५२० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या समर्थकांचे हात बळकट करण्यासाठी या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सत्तेत आलेल्या शिवसेना व भाजपाकडून पक्ष विस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. कुणी सदस्यता नोंदणीवर तर कुणाचा शाखा स्थापनेवर भर आहे. यास्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाही. गावपातळीवरचे राजकारण पक्षाला बाजुला ठेऊन गटातटात केले जाते. या निवडणुकांमध्ये जिल्हा व तालुक्याची नेते मंडळी जाणीवपूर्वकच हस्तक्षेप करण्याचे टाळतात. यंदा मात्र स्थिती उलट दिसत आहे. वार्ड फॉरमेशनमध्ये आपल्या गटालाच अनुकुल स्थिती निर्माण व्हावी यासाठी थेट नेतेमंडळींनी दबावतंत्राचा वापर सुरू केला. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात आक्षेप वार्ड फॉरमेशन प्रक्रियेवर घेण्यात आले. गाव पातळीवरील कार्यकर्त्यांच्या पाठीशी मोठे नेते असल्याने आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)