प्रमाणपत्राने वाढले पालकांचे टेन्शन
By Admin | Updated: June 22, 2014 00:11 IST2014-06-22T00:11:30+5:302014-06-22T00:11:30+5:30
प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते.

प्रमाणपत्राने वाढले पालकांचे टेन्शन
सेतू सुविधा केंद्र : प्रमाणपत्राचे ५०० अर्ज प्रलंबित
यवतमाळ : प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते. याच संधीचा फायदा घेऊन सेतू सुविधा केंद्राच्या परिसरात आर्थिक लूट केली जाते.
बारावीच्या निकालानंतर यवतमाळ तहसीलमध्ये ५०० अर्ज प्रलंबित आहेत. सेतू केंद्राने उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्या नावाने जातीच्या प्रमाणपत्राचे प्रस्ताव तयार केले होते. त्यांची बदली झाल्याने सदर प्रस्ताव परत बोलविण्यात आले. नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावाने हे प्रस्ताव तयार केले जात आहे. त्यामुळे येथे जात प्रमाणपत्राचे अर्ज प्रलंबित आहे. या प्रक्रियेत तहसीलच्या ९ क्रमांकाच्या कक्षातील ‘भैया’ची मनमर्जी चालते तर, बरेचदा ‘भगत’ पावत नसल्याने प्रस्ताव अडकून पडतात. उपविभागीय कार्यालयात बेलसरेंचा अडसरही या प्रस्तावांना पार करावा लागतो. ही प्रक्रियाच खऱ्या अर्थाने अनेकांची डोकेदुखी वाढवत आहे. वरिष्ठांकडून पारदर्शक प्रशासनाची ग्वाही दिली जात असली तरी, यांची मर्जी संपादित केल्याशिवाय सहजासहजी कागद पुढे सरकत नाही.
शासनाने प्रत्येक प्रमाणपत्रासाठी दर निश्चित केले आहे. विहित मुदतीत ते देण्याचे नियमही घालून दिले आहे. एन वेळेवर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या पालकांकडे निर्धारित वेळेपर्यंत थांबण्याची सवड राहात नाही. याच घिसाडघाईचा फायदा तहसील कार्यालय आणि सेतू सुविधा केंद्र परिसरात बसलेले दलाल उठवतात. अडचण ओळखून या कामासाठी नियुक्त कर्मचारीसुध्दा आपले दर वाढवितात. अशा स्थितीत नियोजनबध्द पध्दतीने काम करणाऱ्या सर्वसामान्य पालकांची मात्र मोठी दमछाक होते. रांग तोडून वशीलेबाजी आणि लाच देऊन काम करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील यंत्रणा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे.
यवतमाळ तहसीलमध्ये जूनचा पहिला आठवडा दलालांसाठी सुगीचा असतो. अधिकारी व कर्मचारी विविध सबबी पुढे करून काम लांबविण्याचा प्रयत्न करतात. विशिष्ट व्यक्तिकडून फाईल आल्यानंतर हातोहात काम करून दिले जाते. यात नियमाच्या अधीन राहून अर्ज करणाऱ्यांना विहीत मुदतीपेक्षा अधिक काळ ताटकळत ठेवले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)