पार्सल दरोड्याचा गुंता अद्यापही कायम
By Admin | Updated: November 11, 2014 22:48 IST2014-11-11T22:48:11+5:302014-11-11T22:48:11+5:30
धामणगाव येथून कुरीअर आणि पार्सल घेऊन आलेल्या एका व्यावसायिकाला यवतमाळात सिनेस्टाईल लुटले होते. या दरोड्याच्या घटनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. महागडा ऐवज असलेले पार्सल

पार्सल दरोड्याचा गुंता अद्यापही कायम
यवतमाळ : धामणगाव येथून कुरीअर आणि पार्सल घेऊन आलेल्या एका व्यावसायिकाला यवतमाळात सिनेस्टाईल लुटले होते. या दरोड्याच्या घटनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. महागडा ऐवज असलेले पार्सल परत मिळावे यासाठी संबंधित व्यावसायिक तरुण पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे. मात्र तपास फारसा पुढे सरकला नाही. त्यामुळे पोलिसांची गंभीरता पाहता संपूर्ण तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
गौरव रमेश भिमजीयानी (२२) रा. धामणगाव रेल्वे असे पार्सलवर दरोडा घालण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तो आंगडिया सर्व्हीसचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. सुमारे १० दिवसांपूर्वी तो यवतमाळात पार्सल आणि कुरीअरची डिलेवरी देण्यासाठी एसटी बसने आला होता. यावेळी मागावर असलेल्या आणि बोलेरो वाहनातून आलेल्या एका टोळक्याने येथील स्टेट बँक चौकात त्याच्या तोंडावर स्पे्र उडवून आणि शस्त्राच्या धाकावर पार्सल पळविले. या पार्सलमध्ये एक तर हवालाची रोकड असावी अथवा १७ लाख रुपयांची व्हीसी (वर्थ कॅपीटल) असावे अशी चर्चा येथील व्यावसायिक वर्तुळात आहे. असे असताना पोलिसांनी अद्याप या घटनेचा तपासात फारसे काही निष्पन्न केले नाही.
वास्तविक ते कुरीअर नेमके कोठून आले आणि ते कुणाला पोहचवायचे होते याची माहिती संबंधित टोळक्याला असावी असा अंदाजही पोलिसांतूनच व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्या दिशेने तपासच होत नसल्याने अद्यापही पार्सल दरोड्याचा तिढा कायम असल्याचे सांगण्यात येते. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा चोरीत दडपला. सुरुवातीपासूनच पोलिसांची या तपासात संशयाची भूमिका राहिली आहे. त्यातूनच हा तपास रखडल्याचेही सांगण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी)