‘समांतर’ पोलिसांचेही खांदेपालट
By Admin | Updated: September 3, 2014 00:05 IST2014-09-03T00:05:24+5:302014-09-03T00:05:24+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमधून वाचण्यासाठी पोलिसांनीच समांतर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हाभर वाहनधारकांकडून झीरो पोलीस वसुली करतात. पोलीस दलात झालेल्या

‘समांतर’ पोलिसांचेही खांदेपालट
महागाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमधून वाचण्यासाठी पोलिसांनीच समांतर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हाभर वाहनधारकांकडून झीरो पोलीस वसुली करतात. पोलीस दलात झालेल्या फेरबदलानंतर या समांतर पोलीस यंत्रणेतही खांदेपालट झाली असून महागाव, पुसद भागात असे नवीन झीरो पोलीस दिसत आहे.
जिल्ह्यात समांतर पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. याची माहिती पोलिसांनाही आहे. कारण त्यांनीच या समांतर पोलिसांना पाठबळ दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नेहमीच पोलीस अडकतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली. सध्या जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. वाहतूक पोलिसांचेही फेरबदल झाले. त्याच बरोबर या समांतर पोलिसांचेही फेरबदल झाल्याचे दिसत आहे. काही पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष तेच ते वाहतूक शिपाई स्थानिक पातळीवर दिसतात. परंतु त्यांचे खास विश्वासू म्हणून याच व्यवसायात असलेले खबरे यांची मात्र खांदेपालट झालेली दिसत आहे.
नेहमीचा वाहतूक शिपाई झाडाखाली बसून तर ट्रॅपच्या धाकाने झीरो पोलिसांच्या मदतीने वाहनधारकांकडून वसुली असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात काही अपवाद वगळता दिसून येते. या समांतर पोलिसाला पकडायचे म्हटले तरी कारवाई काय करणार असा सवाल उपस्थित होतो. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात असे किमान तीन ते चार झिरो पोलीस कार्यरत असल्याची माहिती आहे.
आर्णी, महागाव, उमरखेड येथील अनेक जण यात गुंतलेले आहे. पोलिसांपेक्षाही अपडेट राहणारे झिरो पोलीस खऱ्या पोलिसांनाही फिके पाडतात. एखाद्या अनुभवी पोलिसासारखी भाषा वापरुन वाहनधारकांकडून वसुली करतात. परंतु आता त्यांचेही खांदेपालट झाले आहे. महागाव येथील एका अनुभवी झीरो पोलिसाला नांदेड मार्गावरील उमरखेड नाक्यावर हलविण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही झीरो पोलिसांची समांतर यंत्रणा कार्यरत आहे. (शहर प्रतिनिधी)