शतकात पहिल्यांदाच पैनगंगा कोरडीठण्ण!
By Admin | Updated: August 12, 2014 00:10 IST2014-08-12T00:10:49+5:302014-08-12T00:10:49+5:30
दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे.

शतकात पहिल्यांदाच पैनगंगा कोरडीठण्ण!
उमरखेड (कुपटी) : दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे. पैनगंगेचे पात्र कोरडे असल्याने ५४ गावात पाणीप्रश्न निर्माण झाला असून जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. उमरखेड तालुक्याची पैनगंगा जीवनदायिनीच आहे. दरवर्षी उन्हाळ्यापर्यंत या नदीचे पात्र खळखळत असते. परंतु यंदा लांबलेल्या पावसाने पैनगंगेचे पात्र कोरडे आहे. नदी तीरावर भांबरखेडा, जगापूर, तिवरंग, झाडगाव, हातला, मुळावा, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, हिवरा, कारखेड, देवसरी आदी ५४ गावे आहेत. या गावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरी पैनगंगेच्या तीरावर आहे. मात्र पैनगंगेचेच पात्र कोरडे असल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची छाया आहे. परंतु या भागातील लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. मानवासोबतच जनावरांनाही याचा फटका बसत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेवून
दिलासा देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)