पांढरकवडा तालुक्यात ९० हजार ८४४ मतदार
By Admin | Updated: February 5, 2017 00:58 IST2017-02-05T00:58:37+5:302017-02-05T00:58:37+5:30
येत्या १६ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता तालुक्यातील चार जिल्हा परिषद

पांढरकवडा तालुक्यात ९० हजार ८४४ मतदार
जि.प.-पं.स.निवडणुक : चार गटांसाठी २४, तर आठ गणांसाठी ५३ उमेदवारी अर्ज
नरेश मानकर पांढरकवडा
येत्या १६ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात एकुण ९० हजार ८४४ मतदारांची नोंदणी झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा जवळपास १० हजार मतदार वाढले आहेत.
मागील निवडणुकीत मोहदा, पहापळ, पाटणबोरी हे तीनच जिल्हा परिषदेचे गट होते. यावेळी मात्र खैरगाव (बु.) या नवीन गटाची निर्मिती करण्यात करण्यात आली असून आता तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट अस्तित्वात आले आहे. या चारही गटातून एकुण २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
२०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी व युती फिसकटल्यामुळे निवडणुका स्वबळावर लढविण्यात आल्या होत्या. यावेळीसुध्दा हीच परिस्थिती असून काँग्रेस, भाजप, सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवित आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना या पक्षाने चारही गटातून आपले उमेदवार उभे केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने तीनच गटात आपले उमेदवार उभे केले आहे. खैरगाव (बु.) या गटात या पक्षाचा उमेदवारच नाही.
पाटणबोरी हा जिल्हा परिषदेचा एकमेव गट सर्वसाधारण आहे. या गटातून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. या गटात २२ हजार ५२१ मतदार आहेत. पहापळ हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असून या गटातून पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या या गटात २० हजार ८०४ मतदार आहेत. मोहदा हा जिल्हा परिषदेचा गट नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असून या गटातून आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
या २३ हजार ४३९ मतदार आहेत. यावेळी नव्याने तयार झालेला खैरगाव (बु.) हा जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव असून या गटातून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी आपले नामांकन दाखल केले आहे.