साथीच्या रोगांचे थैमान
By Admin | Updated: October 11, 2014 23:14 IST2014-10-11T23:14:55+5:302014-10-11T23:14:55+5:30
सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी

साथीच्या रोगांचे थैमान
वणी : सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी सतत वाढत आहे.
तालुक्यातील नांदेपेरा, मंदर परिसरात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. नांदेपेरा येथे डेंग्यूसदृश तापाने मधुकर अंड्रस्कर, शीतल बोधे या दोघांना बंडवून सोडले आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. नांदेपेरा येथे गावातील घाणीमुळे डासांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी या गावात मलेरिया, डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.
सुरुवातीला आरोग्य विभागाच्या कर्मचारऱ्यांनी नांदेपेरा येथे पोहोचून रुग्णांची तपासणी केली. या कर्मचाऱ्यांनी गावात घाण निर्माण करणाऱ्याची नावेही नोंदविली होती. तथापि, अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तेथील ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे ही कारवाई रखडली, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. प्रशासक मात्र अत्यंत सुस्तच आहे. त्यांना गावाशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. गावातील किमान घाण स्वच्छ करण्याबाबतही ते प्रचंड उदासीन दिसत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील मंदर येथे निर्माण झाली आहे. नुकतीच या परिसरातील एक महिला डेंग्यूसदृश आजाराने दगावली आहे. संबंधित महिलेवर प्रथम वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र नंतर त्या खासगी डॉक्टरने त्या महिलेला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. तेथे उपचारादरम्यानच त्या महिलेचा मृत्यू झाला. परिणामी संबंधित कुटुंबाला आर्थिक भुर्दंडासोबतच जीवित हानीला सामोरे जावे लागले.
मंदर येथेही डेंग्यूसदृश तापाने ग्रामस्थ वैतागले आहेत. मलेरिया, टायफाईड आदी तापांनी जनता हैराण आहे. गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र ग्रामपंचायत उदासीन आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे.
परिणामी या गावातही साथ रोग बळकावत आहे. अनेक रूग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र शासकीय आरोग्य विभाग दिसेनासा झाला आहे. आरोग्य यंत्रणेचे या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या गावात कोणत्याही प्रभावी उपाययोजना आरोग्य विभागाने राबविल्या नाहीत. ग्रामपंचायतीने साधी नाली सफाई केली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)