पायकाची क्रीडांगणे बेपत्ता
By Admin | Updated: November 23, 2014 23:27 IST2014-11-23T23:27:45+5:302014-11-23T23:27:45+5:30
तालुक्यात क्रीडा सुविधांचा अभाव असल्याने युवा पिढी भरकटत आहे. देशी खेळ लुप्त होत असून क्रिकेटमुळे युवक वेडे होत आहे. पायकाची क्रीडांगणे बेपत्ता झाल्याने शाळांमधील चिमुकल्यांनाही खेळणे दुर्लभ

पायकाची क्रीडांगणे बेपत्ता
सुविधांचा अभाव : मारेगाव तालुका क्रीडा संकुलाचे भिजत घोंगडे
अण्णाभाऊ कचाटे - मारेगाव
तालुक्यात क्रीडा सुविधांचा अभाव असल्याने युवा पिढी भरकटत आहे. देशी खेळ लुप्त होत असून क्रिकेटमुळे युवक वेडे होत आहे. पायकाची क्रीडांगणे बेपत्ता झाल्याने शाळांमधील चिमुकल्यांनाही खेळणे दुर्लभ झाले आहे.
सुदृढ व सशक्त युवक तयार व्हावा, युवकांना रोज व्यायामाची सवय लागावी़ आजचा युवक उद्याचे देशाचे भवितव्य असल्याने युवकांच्या कल्याणासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुले उभारण्याची योजना आखली व ती प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला़ क्रीडा संकुलात मोठी इमारत, खेळांची मैदाने, क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिली जातात. प्रत्येक तालुक्याला क्रीडा अधिकाऱ्यांची नेमणूकही केली जाते. त्यानुसार जिल्ह्यात नेर, आर्णी तालुक्यात क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत.
मारेगाव या आदिवासीबहुल तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिली़ दोन वर्षांपूर्वी क्रीडा संकुलांसाठी तीन कोटी निधी मंजूर झाल्याचे तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांनी एका आढावा सभेत सांगितले होते़ मात्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने येथील तालुका क्रीडा संकुल युवकांसाठी दिवा स्वप्न ठरू पाहत आहे़
दुसरीकडे तालुक्यातील एका नामांकीत शिक्षण संस्थेला व्यायाम शाळा इमारत तसेच क्रीडांगणासाठी निधी मंजूर झाला़ तथापि संस्थेने व्यायाम शाळेची नाममात्र इमारत बांधली़ मात्र या इमारतीचा उपयोग व्यायामशाळा म्हणून कधी झालाच नाही़ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी त्याकडेसुद्धा दुर्लक्षच केले़ ग्रामीण युवकांना खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून पायकाअंतर्गत तालुक्यातील बोरी (बु़), बोटोणी, कोलगाव, कुंभा, मारेगाव, नवरगाव, नरसाळा, सराटी, वेगाव, मार्डी ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाखाप्रमाणे क्रीडांगणासाठी निधी क्रीडा विभागाने उपलब्ध करून दिला़ त्यातील मार्डी, कोलगाव, बोटोणी ग्रामपंचायतीने जागेअभावी निधी खर्च केला नाही, तर बोरी (बु़), मारेगाव, वेगाव ग्रामपंचायतीने सर्व निधी खर्च केला. कुंभा, नरसाळा, सराटी ग्रामपंचायतीने प्रत्येकी ५० हजार, तर नवरगाव ग्रामपंचायतीने ७० हजार क्रीडांगणावर खर्च केल्याची माहिती आहे. मात्र खेळाडूंसाठी सुसज्ज मैदाने कुठेच दिसून येत नाही.
तालुक्यात २५ हायस्कूल, १० कनिष्ठ महाविद्यालये, एक कला महाविद्यालय आहे़ तथापि शाळांमध्ये क्रीडा साहित्यांचा अभाव आहे़ काही शाळांना मैदाने आहेत़ शालेय वेळापत्रकात स्वतंत्र तासिका दाखविल्या आहेत़ शाळांत क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत़ तथापि खेळाच्या तासिका खेळासाठीच वापरल्या जातात की नाही, याबद्दल संभ्रम आहे़ त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा केवळ सोपस्कर ठरल्या आहेत़
तालुक्यात दरवर्षी पावसाळी, हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते़ मात्र शाळांतून विशेष सराव न घेता औपचारिकता म्हणून चमू क्रीडांगणावर उपस्थित होतात व क्रीडा अधिकारी व मुख्याध्यापक सांगतात म्हणून सोपस्कर पार पाडले जातात़ जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात पंचायत समिती स्तरावर कला व क्रीडा स्पर्धांचे प्रथम विभागीय व नंतर अंतिम क्रीडा सामने आयोजित केले जातात़
पदाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन करून कधी सराव न घेता वेळेवर क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन स्पर्धा पार पाडल्या जातात़ वर्षभर खेळासाठी विद्यार्र्थ्यांना प्रोत्साहीत न करता या क्रीडा स्पर्धासुध्दा फार्स ठरल्याचे दिसून येते़ यावर वेळीच उपाययोजना करण्याची आता खऱ्या आर्थने गरज निर्माण झाली आहे.