पुणे व हरियाणाचे पहेलवान विजेता
By Admin | Updated: November 26, 2014 23:14 IST2014-11-26T23:14:08+5:302014-11-26T23:14:08+5:30
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला हमखास पदक मिळवून देणारे हरियाणा राज्य. याच राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मातब्बर अरविंद पहेलवानाला मराठमोळ्या पोपट घोडके या पहेलवानाने परंपरागत

पुणे व हरियाणाचे पहेलवान विजेता
कुस्तींची विराट दंगल : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह
नीलेश भगत - यवतमाळ
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला हमखास पदक मिळवून देणारे हरियाणा राज्य. याच राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मातब्बर अरविंद पहेलवानाला मराठमोळ्या पोपट घोडके या पहेलवानाने परंपरागत लाल मातीच्या कुस्तीत तब्बल तीस मिनिट चिवट झुंज दिली. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी भात्यातील सर्व डाव आजमाविले. मात्र कोणीही अस्मान पाहायला तयार नव्हते. काट्याच्या या लढतीत कोणीही ‘चित’ होवू न शकल्याने अखेर दोघांनाही संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. दिवंगत सुभाषदादा बाजोरिया स्मृती ५१ हजारांचे प्रथम बक्षीस आणि स्मृतिचिन्ह या दोघांना विभागून देण्यात आले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृती दिनानिमित्य जिल्हा कुस्तीगिर संघटनेच्यावतीने सात लाख रुपयांच्या भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल स्थानिक ऐतिहासिक हनुमान आखाड्यात मंगळवारी पार पडली. या स्पर्धेत दिल्ली, हरियाणा, भिलाई (मध्य प्रदेश), मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, जळगाव, अकोला, अमरावती, कारंजा, हिंगोली, नाशिक आदी ठिकाणचे ४०० मल्लांनी सहभाग घेतला होता. पुण्याच्या पोपट पहेलवान आणि हरियाणाच्या अरविंद पहेलवानाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, प्रशांत बाजोरिया, राजलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष अरविंद तायडे, प्रताप पारसकर, सुरेश जयसिंगपुरे, दीपक ठाकूर, अनिल पांडे यांच्या उपस्थितीत रोख पुरस्कार व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाच्या ४१ हजार रुपयाच्या कुस्तीसाठी नांदेडचा कसलेला मल्ल योगेश पहेलवान व हिंगोलीचा गजानन पहेलवान या तुल्यबळ लढत झाली. गजानन पहेलवानाने दोन वेळा ‘मोंढा’ डाव मारून योगेश पहेलवानाला जेरीस आणले. दरम्यान योगेश पहेलवानाच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने हौदातून अर्ध्यावर डाव सोडला. त्यामुळे हिंगोलीच्या पहेलवानाला विजयी घोषित करण्यात आले.
३१ हजार रुपयांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी हिंगोलीचा कपिल पहेलवान आणि पुण्याचा अनुभवी लखन पांढरे पहेलवानात चुरशीची लढत झाली. १५ मिनिट चालेल्या या कुस्तीत कुणीही ‘चितपट’ होवू शकले नाही. त्यामुळे कुस्ती बरोबरीत सुटली. दिल्लीचा सव्वा पाच फूट उंचीचा रेखीव बांध्याचा मल्ल मुकेश पहेलवान व जळगाव (खानदेश) चा सहा फूट उंचीचा प्रवीण पहेलवान यांच्यात चौथ्या क्रमांकाच्या २५ हजार रुपयांच्या बक्षिसासाठी झालेली लढत प्रेक्षणिय झाली. या कुस्तीत बुद्धी व शक्तीची झुंज पाहायला मिळाली. दिल्लीच्या पहेलवानाने चपळाईने ‘ढाक’ व ‘मुलतानी’ डाव मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवीण पहेवानाच्या शक्तीसमोर त्याचे सर्व डाव फसले. ८ व्या मिनिटात प्रवीण पहेलवानाने ‘बांगडी’ डाव टाकून मुकेशला अस्मान दाखविले. चिवट झुंज देणाऱ्या मुकेशने पराभूत होवूनही प्रेक्षकांची त्याने वाहवा मिळविली.
पाचव्या क्रमांकाच्या २० हजार रुपयांच्या बक्षिसासाठी नाशिकचा नारायण मार्कंड पहेलवान आणि पुण्याचा शैलेश शेळके पहेलवान यांच्यात झालेल्या रोमहर्षक कुस्तीत शेळके पहेलवानाने अवघ्या दोन मिनिटात प्रतिस्पर्धी नारायण पहेलवानाला चित केले. पुसदचा लक्ष्मण पहेलवान याने बेलवाडी (हिंगोली) च्या संजय पहेलवानाची कडवी झुंज मोडून काढत त्याला १२ मिनिटात धुळ चारून सहाव्या क्रमांकाचे १५ हजार रुपयाचे रोख बक्षीस पटकाविले.
या स्पर्धेतील प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती राकेश पहेलवान मुंबई व संजय पहेलवान नांदेड यांच्यात झाली. १७ मिनिट चाललेल्या या कुस्तीत डाव-प्रतिडाव, कौशल्य, शक्ती-युक्ती सर्व पाहायला मिळाले. या संपूर्ण कुस्तीत नांदेडचा पहेलवानाने आपल्या पोलादी पकडीने वर्चस्व मिळवित अनुभवी राकेश पहेलवानाला ‘धोबीपछाड’ देवून सातव्या क्रमांकाच्या १० हजार रुपयाच्या कुस्तीत विजय संपादन केला. आठव्या क्रमांकाचे सात हजार रुपये बक्षीस असलेली कुस्ती बरोबरीत सुटली. मुंबईचा परवेश पहेलवान आणि पुण्याचा चेतन पाटील यांच्यात ही लढत दहा मिनिट चालली. नवव्या क्रमांकाची पाच हजार रुपये बक्षीस असलेली कुस्तीही बरोबरीत सुटल्याने प्रेक्षकांची निराशा झाली. वाशिमचा शेषराव पहेलवान आणि हिंगोलीच्या वाल्मिक पहेलवान यांच्यात ही लढत झाली होती.
तीन हजार रुपये बक्षीस असलेली कुस्ती रोमहर्षक झाली. जळगावच्या बाळू पहेलवानाने अवघ्या ३० सेकंदात पुसदच्या अभिमन्यू पहेलवानाला ‘खपसी’ डाव टाकून धूळ चारली व शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा प्रत्यय दिला. आनंद पहेलवान हिंगोली याने वर्धेच्या नवनाथ पहेलवान यांच्यात कुस्ती झाली. आनंद पहेलवानने यात विजय संपादन करून दोन हजार रुपयाचे बक्षीस जिंकले. नांदेडच्या कैलाश पहेलवानाने महागाव तालुक्यातील माळकिन्हीच्या रफिक पहेलवानाला अस्मान दाखवून एक हजार रुपयाचे बक्षीस जिंकले.
या स्पर्धेत पंच म्हणून अनिल पांडे, उद्धव बाकडे, मोहम्मद शकील यांनी काम पाहिले.