अतिपावसाने शंभर एकर जमीन खरडली
By Admin | Updated: June 26, 2017 00:52 IST2017-06-26T00:52:59+5:302017-06-26T00:52:59+5:30
काळी दौ. परिसरातील कौडगाव शिवारातील जमीन मुसळधार पावसाने खरडून गेली. यामुळे १०० एकर जमीन

अतिपावसाने शंभर एकर जमीन खरडली
शेतकरी संकटात : कौडगाव शिवारात नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : काळी दौ. परिसरातील कौडगाव शिवारातील जमीन मुसळधार पावसाने खरडून गेली. यामुळे १०० एकर जमीन बाधित झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले.
गेल्या १३ जून रोजी पुसद तालुक्यासह लगतच्या तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहिले. यावेळी महागाव तालुक्यातील कौडगाव परिसरात पांदण रस्त्याचे काम सुरू होते. अद्यापही हे काम अर्धवट आहे. झालेले कामही सदोष आहे. पांदण रस्त्याच्या बांधकामात पाण्याची नीट विल्हेवाट लावण्याबाबत उपाययोजना करण्यात आली नाही. टाकलेले पाईपसुद्धा अत्यंत लहान असल्याने जागोजागी पाणी तुंबले आहे. या सदोष बांधकामामुळे मुसळधार पावसाचे पाणी लगतच्या शेतात शिरून जवळपास १०० एकरवरील जमीन खरडली आहे. या शेतातील संपूर्ण मातीच वाहून गेली. जागोजागी धुरे फुटलेले आहे. काही शेतांना तलावाचे स्वरूप आले. यामुळे नुकतीच पेरणी केलेले खरिपाचे बियाणेही वाहून गेले. काहींच्या शेतातील अंकुरलेली रोपेही वाहून गेली. कौडगाव-पिंपळगाव या पांदण रस्त्याचे बांधकाम पंचायत समिती महागावअंतर्गत सुरू आहे. अद्याप हे काम अर्धवटच आहे. झालेले कामही सदोष असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. प्राजक्ता शैलेश कन्नावार, आनंदराव भोने, इंदल जाधव, रमेश तुकाराम डुबेवार, रमेश भोगावकर, शांताबाई भोने आदी शेतकऱ्यांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.