27 हजार 698 पैकी केवळ 63 विद्यार्थी नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:22+5:30
परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के इतके आहे.

27 हजार 698 पैकी केवळ 63 विद्यार्थी नापास
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही यवतमाळ जिल्ह्याने या निकालात बाजी मारली आहे. अमरावती विभागात यवतमाळ अव्वल ठरला असून जिल्ह्याचा ९९.७७ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा केवळ ६३ विद्यार्थी नापास झाले आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचे १८ विद्यार्थीही परीक्षेत अयशस्वी ठरले.
परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के इतके आहे. 
सात तालुक्यांचा १०० टक्के निकाल मंगळवारी जाहीर झालेला इयत्ता बारावीचा निकाल सर्वार्थाने उच्चांकी ठरला. जिल्ह्यातील तब्बल पाच तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणी, झरी जामणी, पांढरकवडा, मारेगाव, आणि बाभूळगाव  या तालुक्यांचा समावेश आहे.  दरम्यान, यंदा बारावीची लेखी परीक्षा प्रत्यक्ष न झाल्याने मागील वर्षीच्या मूल्यांकनावर निकाल लावल्याने टक्का वाढल्याचे दिसत आहे. 
वाणिज्यसह जुन्या अभ्यासक्रमाचाही १०० टक्के निकाल
- यंदा बारावी परीक्षेत विक्रमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यातही कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेला दोन हजार ४७६ विद्यार्थी बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या बरोबरच सायन्सच्या जुन्या अभ्यासक्रमाचेही सर्वच्या सर्व १८४ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. 
- कॉमर्स शाखेतून १२२६ मुले आणि १२५० मुली अशा एकूण २४७६ जणांनी परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहे. विज्ञान शाखेतून पाच हजार ५५० मुले आणि पाच हजार २०१ अशा दहा हजार ७५१ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील दहा हजार ६९७ म्हणजेच ९९.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
- कला शाखेतून सहा हजार ७२४ मुले आणि सहा हजार ७३८ मुली अशा १३ हजार ४६२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३ हजार ४५४ म्हणजेच ९९.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
- व्होकेशनलमधून ७७८ मुले आणि २३१ मुली अशा एक हजार ९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यातील एक हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९९.९० लागला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचाही यंदा घवघवीत निकाल लागला आहे. 
- विज्ञान शाखेतून १२५ मुले आणि ५९ मुली अशा १८४ जणांनी परीक्षा दिली होती. हे सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेच्या जुन्या अभ्यासक्रमासाठी ७८२ मुले आणि २७१ मुली अशा १०५३ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १०५२ म्हणजेच ९९.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
- वाणिज्य शाखेच्या जुन्या अभ्यासक्रमाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. परीक्षा दिलेले सर्व ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याच बरोबर जुन्या अभ्यासक्रमातून व्होकेशनलसाठी बसलेले सर्व १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
कला शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी फेल
- बारावीच्या परीक्षेत मूल्यमापन करताना महाविद्यालयांतर्गत घेतल्या गेलेल्या विविध चाचण्या, प्रात्यक्षिक आणि मागील वर्षाच्या एकूण मूल्यांकनावर विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आले. याशिवाय काही विद्यार्थी नाव टाकल्यापासून काॅलेजकडे फिरकलेच नाही. तर काहींनी कुठल्याही परीक्षा, टेस्ट, प्रॅक्टीकल सादर केले नाही. असे विद्यार्थी परीक्षेत नापास झाले. यामध्ये कला शाखेतील ३८ मुले आणि १६ मुली, वाणिज्य शाखेतील सात मुले, एक मुलगी तर विज्ञान शाखेतील एक मुलगी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली आहे.