दरोड्यातील दुसरे वाहन जप्त
By Admin | Updated: October 7, 2016 02:39 IST2016-10-07T02:39:43+5:302016-10-07T02:39:43+5:30
शहरातील सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींकडून शहर ठाण्याच्या शोध पथकाने दुसरे वाहन जप्त केले.

दरोड्यातील दुसरे वाहन जप्त
सेमिनरी ले-आऊट : गुन्ह्यात महिला आरोपींचीही भूमिका महत्वाची
यवतमाळ : शहरातील सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींकडून शहर ठाण्याच्या शोध पथकाने दुसरे वाहन जप्त केले. आरोपींमध्ये समन्वय घडवून आणणाऱ्या महिलेने दरोड्याचा गुन्हा घडण्यापूर्वीच नागपुरातील पार्डी दुर्गानगर येथे आत्महत्या केल्याचेही पोलीस तपास पुढे आले आहे.
सेमिनरी ले-आऊट येथील अनिल खिवंसरा यांच्याकडे दरोडा घालण्यासाठी त्यांची मोलकरीण व तिचा पती यांच्याकडून माहिती पुरविण्यात आली. नागपुरातील आरोपींशी संधान साधून देणाऱ्या नीता प्रवीण भांडारकर (३२) रा. दुर्गानगर (पार्डी) नागपूर या महिलेचा पोलीस शोध घेत होते. या महिलेने कळंब येथील लक्ष्मण ढोले याची आरोपी इमली उर्फ प्रिया यादव हिच्याशी ओळख करून दिली. या गुन्ह्यात रेकी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली तवेरा क्र.एम.एच-३२-सी-००११ हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वाहनातून आरोपींनी २६ सप्टेंबर रोजी खिवंसरा यांच्या घराची रेकी केली होती. या गुन्ह्याचा तपास शोध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक मंगेश भोयर व त्यांचे सहकारी करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)