संघटित गुन्हेगारी ठेचून काढणार
By Admin | Updated: May 11, 2017 01:01 IST2017-05-11T01:01:40+5:302017-05-11T01:01:40+5:30
गेल्या काही वर्षात संघटित गुन्हेगारी छोट्या शहरांमध्येही बळावली.

संघटित गुन्हेगारी ठेचून काढणार
अपर पोलीस अधीक्षक : अवैध धंद्यांवरही लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या काही वर्षात संघटित गुन्हेगारी छोट्या शहरांमध्येही बळावली. यवतमाळातही हा प्रकार चांगलाच रूजला आहे. त्यामुळे अवैध धंदे आणि संघटीत गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
जाधव यांनी यवतमाळच्या अपर पोलीस अधीक्षकांचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा करतानाच त्यांच्या कार्याची रुपरेषा स्पष्ट केली. मूळ सातारा येथील असलेले जाधव यांनी यापूर्वी बीड, अकोला शहर, कोल्हापूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काम केले आहे. अकोला शहर हे गँगवारसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सलाम गँगवर ३२ गुन्हे दाखल असून या गँगसह तेथील इतरही संघटित गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्यात त्यांनी बऱ्यापैकी यश मिळविले. त्यामुळे यवतमाळातही गँगवारसारख्या गुन्हेगारीवर आपण पूर्णपणे प्रतिबंध घालू, असे ते म्हणाले.
इतर अवैध धंदे फोफावणार नाही याकडे लक्ष देऊ. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहिल, यासाठी आपण प्रयत्न करू. मंगळसूत्र चोरी, बसस्थानकावरील चोऱ्या, घरफोड्या आदींवर आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठीसुद्धा पोलिसांच्या विविध शाखांद्वारा विशेष प्रयत्न करणार असल्याचे अमरसिंह जाधव म्हणाले.
जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक असून त्यासाठी पोलिसांनी जनतेमध्ये मिसळून त्यांचा विश्वास संपादन करावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर उपस्थित होते.
सुसंवादासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण
पोलीस आणि जनतेचे सबंध परस्पर विश्वासार्हतेचे निर्माण व्हावे, संवाद वाढावा यासाठी विद्यार्थी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. मुंबई पोलीस कायद्यानुसार आम्ही शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमच्या कार्यात सहभागी करून घेऊ शकतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना या कामाची माहिती आवश्यक आहे. सोबतच पालक, शिक्षक आणि जनतेमध्येही पोलिसांप्रती विश्वास निर्माण होईल. महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी शहर व गावांमध्ये लोकांमध्ये मिसळून कॉर्नर मिटींग घ्याव्या, त्यामुळे महिलांमध्ये पोलिसांप्रती असलेली नकारात्मकता कमी होइल, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव म्हणाले.