ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश
By Admin | Updated: May 13, 2015 02:12 IST2015-05-13T02:12:40+5:302015-05-13T02:12:40+5:30
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाने अफलातून आदेश काढला आहे.

ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाने अफलातून आदेश काढला आहे. तालुकांतर्गत बदल्यासाठी ५ ते १५ मे दरम्यान प्रक्रिया राबविण्याचा आदेश चक्क ११ मे रोेजी देण्यात आला आहे. आता उरलेल्या तिन दिवसात ही प्रक्रिया पुर्ण कशी करायची याचा पेच जिल्हा परिषदे समोर आहे.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या जुन्याच आदेशप्रमाणे होतील हे ग्राम विकासाने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्यांचे डोहाळे लागले होते. ग्रामविकास विभागाने ११ मे रोजी परिपत्रक काढून सर्वांनाच धक्का दिला. जिल्हा परिषदांनी गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या तालुका आणि जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेचा कार्यक्रमच देण्यात आला. मात्र यात ग्रामविकास विभागाने फार मोठी घोडचूक केली आहे. तालुक्यातंर्गत बदल्या ५ ते १५ मे आणि जिल्हास्तरीय बदल्या १६ ते २५ मे दरम्यान करण्याचा आदेश दिला आहे. या प्रक्रिया आदेशाची प्रत जिल्हा परिषद प्रशासनाला ११ मे रोजी मिळाली आहे. त्यामुळे आता उर्वरित तीन दिवसात तालुक्यातंर्गत बदल्या कश्या करायच्या याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात बदली प्रक्रिया पारदर्शक होणार, अशी ग्वाही प्रशासनाकडून नेहमीच दिली जाते. प्रत्यक्षात मात्र आयत्या वेळी घोळ घालून मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाठाल होते. याला थेट ग्रामविकास विभागाकडूनच पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.
जिल्हा परिषदेतील बदल्या ह्या अनेकांसाठी सुगीचा काळ असतो. सोयीच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी अनेकांची किमंत मोजण्याची तयारी असते. त्यांच्यासाठी अधिकाऱ्यांकडून बदली प्रक्रियेत मोठी अनियमितता देखिल केली जाते. हा प्रकार विशेष करून शिक्षण आणि आरोग्य विभागात होते. यावर्षी तर ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या आदेशाने आयती संधीच अनेकांना चालून आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षक संघ वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणिस मधुकर काठोळे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)