क्रशरच्या वीज जोडणीचे न्यायालयाकडून आदेश
By Admin | Updated: March 2, 2016 02:50 IST2016-03-02T02:50:03+5:302016-03-02T02:50:03+5:30
जिल्ह्यातील २० क्रशर मालकांच्या वीज जोडण्या कापण्यात आल्या होत्या. क्रशर मालकांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरही वीज जोडण्या झाल्या नाही....

क्रशरच्या वीज जोडणीचे न्यायालयाकडून आदेश
२० जणांना दिलासा : ३ मार्चपर्यंत अहवाल देण्याचे आदेश
यवतमाळ : जिल्ह्यातील २० क्रशर मालकांच्या वीज जोडण्या कापण्यात आल्या होत्या. क्रशर मालकांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरही वीज जोडण्या झाल्या नाही. याविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ६ फेबु्रवारीला क्रशर मालकांच्या बाजूने निर्णय देत वीज जोडणी करण्याचे आदेश दिले. ३ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
सन २०१४ मध्ये जिल्ह्यातील ३०० क्रशरपैकी ४० क्रशरचे रिनिवल करायचे होते. १५ ते २० क्रशर मालकांचे रिनिवल झाले. मात्र दीड वर्षापासून २० क्रशर मालकांच्या क्रशरचे रिनिवलच झाले नाही. कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतरही अॅग्रीमेंट झाले होते. मात्र आॅर्डर नव्हती. यामुळे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी क्रशरची वीज जोडणी कापण्याचे आदेश दिले होते. यामुळे अन्यायग्रस्त क्रशर मालकांनी जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले. यासंदर्भात न्यायालयाने क्रशर मालकांच्या बाजूने निकाल दिला. वीज जोडणी करून अॅग्रीमेंट करीत अहवाल १४ दिवसात न्यायालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने विजेच्या १२ युनिटला एक ब्रास या प्रमाणे रेव्हेन्यू आकारण्यात आला होता. मायनिंग अँड मिनरल अॅक्टमध्ये कुठलीही तरतूद नसताना भोगवट मूल्य जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी आकारले होते. राज्यात कुठेही सदर मूल्य आकारण्यात येत नाही. याबाबतची कबुली खुद्द खनिकर्म अधिकाऱ्यांनीच दिली होती. यानंतरही भोगवट मूल्य जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी आकारले होते.
खनिकर्म विभागाच्या निर्णयाविरोधात मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली असता कोर्टाने २३ नोव्हेंबर रोजी याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय दिला. इलेक्ट्रिक डिमांडप्रमाणे केलेली बिले रद्द करून क्रशरची वीज जोडणी करावी आणि क्रशर चालू करावे, असे आदेश दिले. मात्र दीड महिन्यापर्यंत खनिकर्म विभागाने कारवाई केली नाही. यामुळे क्रशर मालकांनी जिल्हा न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या प्रकरणात क्रशर मालकाच्या बाजूने न्यायालयाने ६ फेब्रुवारीला निर्णय दिला. यासदंर्भात ३ मार्चपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (शहर वार्ताहर)
जोडणीच्या प्रतीक्षेतील क्रशर मालक
प्रदीप लाखानी, शशिकांत दालभक्त, दीपक अग्रवाल, चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी, नीलेश मानकर, दिवाकर किणीकर, विजय वारजोरकर, अशोक निलावार, दिलीप शाह, प्रभाकर देव, सय्यद मुसा, नरेंद्रसिंह गौतम, घनश्याम जोशी, रंजितसिंह गौतम, राजू मॅथ्यू, मुकुंद औदार्य, पुरूषोत्तम डाखोरे हे क्रशर मालक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा प्रशासन अपील दाखल करणार
क्रशर प्रकरणात जिल्हा प्रशासन अपील दाखल करणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वीज जोडणीसाठी २० क्रशर मालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.