पीक नुकसानीचे दोन लाख देण्याचा आदेश
By Admin | Updated: February 14, 2016 02:12 IST2016-02-14T02:12:47+5:302016-02-14T02:12:47+5:30
शॉर्टसर्किटने शेती पिकाचे नुकसान झाल्याची भरपाई वीज कंपनीने शेतकऱ्याला द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे.

पीक नुकसानीचे दोन लाख देण्याचा आदेश
लोणीचा शेतकरी : विद्युत कंपनीला चपराक
यवतमाळ : शॉर्टसर्किटने शेती पिकाचे नुकसान झाल्याची भरपाई वीज कंपनीने शेतकऱ्याला द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. राळेगाव तालुक्याच्या लोणी येथील शेतकरी रणजित सुधाकरराव कोरडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यांना एक लाख ९४ हजार ८१३ रुपये भरपाई द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.
रणजित कोरडे यांच्या शेताच्या बांधावर डीपी बसविण्यात आली आहे. ८ मार्च २०१० रोजी डीपीमध्ये शॉर्टसर्किट होवून कोरडे यांच्या शेतातील पिकासह फळझाडे जळाली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे मूल्यांकन केले. एक लाख ८४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला. वन अधिकाऱ्यांनी सागवान वृक्षाचे १० हजार ३१३ रुपयांचे नुकसान झाल्याचे कळविले. यासह इतर अशी चार लाख ६२ हजार ४७६ रुपये भरपाई मिळावी, अशी विनंती कोरडे यांनी विद्युत कंपनीकडे केली. मात्र टाळाटाळ करण्यात आली. विविध कारणे आणि स्पष्टीकरण दिले गेले. त्यामुळे कोरडे यांनी ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली.
मंचने दोन्ही बाजूचा युक्तिवाद जाणून घेत शेतकरी रणजित कोरडे यांच्या बाजूने निकाल दिला. शासकीय अहवालानुसार विद्युत कंपनीने या शेतकऱ्याला एक लाख ९४ हजार ८१३ रुपये, मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये व तक्रार खर्चाचे एक हजार रुपये द्यावे, असा आदेश विद्युत कंपनीला दिला आहे. तक्रार निवारण न्याय मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य डॉ.अशोक सोमवंशी, सदस्य अॅड.आश्लेषा दिघाडे यांनी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात कोरडे यांची बाजू अॅड.माने यांनी मांडली. (वार्ताहर)