विद्यार्थ्यांना एकच गणवेशप्रकरणी ‘सीईओं’नी दिले चौकशीचे आदेश
By Admin | Updated: September 5, 2015 02:54 IST2015-09-05T02:54:33+5:302015-09-05T02:54:33+5:30
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी दोन गणवेश देण्याचे आदेश आहे.

विद्यार्थ्यांना एकच गणवेशप्रकरणी ‘सीईओं’नी दिले चौकशीचे आदेश
कळंब : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी दोन गणवेश देण्याचे आदेश आहे. मात्र तालुक्यातील काही शाळांनी एकच गणवेश दिला. याविषयी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले.
पहिली ते आठवीच्या अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीमधील सर्व मुलांना आणि इतर समाजातील सर्व मुलींना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे शासनाचे आदेश आहे. यासाठी शाळेच्या बँक खात्यात विद्यार्थी संख्येच्या आधारावर निधी वळता करण्यात आला. तालुक्यात २२ लाख रुपये गणवेशासाठी वाटप करण्यात आले. परंतु अनेक शाळांनी केवळ एकच गणवेश दिला.
सत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटत आल्यानंतरही दुसऱ्या गणवेशाचे वाटप करण्यात आलेले नाही. मात्र वृत्त प्रकाशित होताच अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी गणवेश खरेदी केले. काही शाळांनी अजूनही दोन गणवेश दिलेले नाही. तालुक्यात अशा किती शाळा आहे, याची माहिती शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख अशा शाळांची माहिती गोळा करत आहेत.
निविदा न मागताच गणवेश खरेदी करण्यात आली आहे. शिवाय वर्षानुवर्षांपासून चालत आलेला विद्यार्थ्यांचा ड्रेसकोड अनेक शाळांनी बदलविला. आता या संदर्भातील प्रोसेडिंगची तपासणी गटविकास अधिकारी गणेश गायनर यांनी सुरु केली आहे. (तालुका प्रतिनिधी)