बाजार समिती माजी सभापती व सचिवांच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: November 7, 2015 02:45 IST2015-11-07T02:45:54+5:302015-11-07T02:45:54+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंजूर अर्थसंकल्पात लेखाशिर्षनिहाय मंजुरीपेक्षा २६ लाख ७७ हजार एवढी रक्कम अधिक खर्च केल्या प्रकरणी

बाजार समिती माजी सभापती व सचिवांच्या चौकशीचे आदेश
सहकार आघाडीची तक्रार : लाखो रुपयांच्या गैरप्रकाराचा संशय
पुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंजूर अर्थसंकल्पात लेखाशिर्षनिहाय मंजुरीपेक्षा २६ लाख ७७ हजार एवढी रक्कम अधिक खर्च केल्या प्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती व सचिवांच्या चौकशीचे आदेश विशेष लेखा परीक्षकांनी दिले आहे. याप्रकरणी पुसद तालुका सहकार आघाडीने तक्रार केली होती.
येथील बाजार समितीचे माजी सभापती अवचितराव पवार, तत्कालिन सचिव सु.न. पद्मावार आणि आर.एस. कान्हु यांच्या कार्यकाळात २००८-०९ ते २०११-१२ या कालावधीत मंजूर अर्थसंकल्पात लेखाशिर्षनिहाय मंजुरीपेक्षा रक्कम अधिक खर्च झाला होता. याची तक्रार पुसद तालुका सहकार आघाडीचे अॅड़ सचिन नाईक, ज्ञानेश्वर तडसे, दिलीप पोल्हे, निखिल चिद्दरवार, विनोद जिल्हेवार, अॅड़ उमाकांत पापीनवार, अॅड़ गजानन देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले. त्यानुसार चौकशी अधिकारी म्हणून विशेष लेखा परिक्षक एस.एस. बन्सोड यांची नियुक्त करण्यात आली. चौकशी समितीच्या अहवालानुसार बाजार समितीने कोणत्याही मंजुर केलेल्या अर्थसंकल्पातील अधिक खर्च करता येणार नाही. मात्र इतर शिर्षकाखाली ज्या शिल्लक रकमा राहतात त्याचे पुर्ननियोजन करून किंवा पुरवणी अर्थसंकल्प करून त्याला मंडळाची किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याची मान्यता घेऊन मंजुरी घेता येते. परंतु माजी सभापती व तत्कालिन सचिवांनी २००८-०९ मध्ये पाच लाख९६ हजार १२८ रुपये, २००९-१० मध्ये नऊ लाख ३४ हजार ९२ रुपये, २०१०-११ मध्ये सहा लाख ३० हजार २६ असा सदर ज्यादा झालेल्या खर्चाचे पुरवणी अर्थसंकल्पसुद्धा सादर केला नाही. २०१०-११ मध्ये दोन लाख ९७ हजार १४३ रुपये ज्यादा खर्च केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमनुसार कर्तव्यात कसूर करणे तसेच कलम ४५ नुसार शक्तीचा दुरूपयोग करून निधीचा दुरूपयोग केला. त्यामुळे संबंधित कालावधीत संबंधित पदाधिकाऱ्यांना जबाबदार समजून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश लेखा परीक्षक एस.एस. बन्सोड यांनी दिले आहे. त्यामुळे
तालुक्यात खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)