दारव्ह्यात भाजपाची विरोधी पक्षनेतेपदाची संधी हुकली
By Admin | Updated: March 2, 2017 00:51 IST2017-03-02T00:51:36+5:302017-03-02T00:51:36+5:30
नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चाललेल्या चढाओढीनंतर काँग्रेसच्या सारिका सचिन राऊत यांची ...

दारव्ह्यात भाजपाची विरोधी पक्षनेतेपदाची संधी हुकली
नगराध्यक्षांचे रूलिंग : काँग्रेसच्या नगरसेविका सारिका राऊत यांची निवड
दारव्हा : नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चाललेल्या चढाओढीनंतर काँग्रेसच्या सारिका सचिन राऊत यांची विरोधी पक्षनेत्या म्हणून निवड करण्यात आली. या निवडीच्यावेळी फार वाद झाला नसला तरी नगरपरिषदेत सत्तेतील भागिदार सेना-भाजपाचे कुरघोडीचे राजकारण याहीवेळी पहायला मिळाले.
भाजपाकडून या पदासाठी शुभम गवई यांचे नाव सुचविण्यात आले होते. परंतु सभेचे अध्यक्ष नगराध्यक्षांनी रूलिंगचा वापर करत भाजपा सत्तेत असल्याने या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे भाजपाची संधी हुकल्याचे बोलले जात आहे.
विरोधी पक्षनेत्याची निवड यासह विविध विषयाकरिता नवीन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. नगरपरिषदेत एकत्र येवून सत्ता स्थापन केल्यानंतर सभापती निवडीच्यावेळी या सत्ताधारी पक्षात वादाची ठिणगी उडाली. त्यानंतर या सभेमध्येही विरोधी पक्षनेत्याची निवड करताना या दोन पक्षामध्ये अद्याप फिलगुड नसल्याचे पाहायला मिळाले. या पदासाठी काँग्रसकडून प्रभाग-१ च्या नगरसेविका सारिका सचिन राऊत आणि भाजपाकडून प्रभाग-२ चे नगरसेवक शुभम गवई यांचे नाव सुचविण्यात आले होते.
सभेच्या प्रोसेडिंगमध्ये दोन् ही प्रस्तावांची नोंद घेण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष बबनराव इरवे यांनी नियमाचा आधार घेत भाजपा सत्तेत असून त्यांचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येणार नाही, असे रूलिंग दिले. अध्यक्षांच्या या भूमिकेनंतर सारिका राऊत यांचा मार्ग मोकळा झाला. (तालुका प्रतिनिधी)
कुरघोडीचे राजकारण, पक्षसंघर्षाची चिन्हे
त्रक निवडणुकीनंतर सेनेचे आठ, भाजपा चार व एक अपक्ष अशी युती होवून सत्ता स्थापन झाली. त्यानंतर भाजपाकडे उपाध्यक्षपद देण्यात आले. मात्र काही दिवसातच झालेल्या सभापती निवडीच्यावेळी या दोन पक्षात वाद झाला. सेनेने समाजवादी पार्टीला सत्तेत सहभागी करून घेतल्याबद्दल भाजपाने सभापती निवडीच्यावेळी स्वत:ला दूर ठेवले आणि आता विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीतसुद्धा कुरघोडीचे राजकारण झाल्याने या पक्षामधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहे.