मारेगाव येथे विकास कामात विरोधकांचा अडथळा
By Admin | Updated: October 1, 2015 02:26 IST2015-10-01T02:26:09+5:302015-10-01T02:26:09+5:30
तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामात विरोधक अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार सरपंच किरण गेडाम..

मारेगाव येथे विकास कामात विरोधकांचा अडथळा
वणी : तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामात विरोधक अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार सरपंच किरण गेडाम यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मारेगाव (कोरंबी) येथील गटग्रामपंचायतीला तेराव्या वित्त आयोगातून एक लाख ४५ हजारांचा निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायतीने २२ जून रोजी मासिक सभा घेतली. त्यात सतीश काळे ते डोंगरकर यांचे घरापर्यंत ३५ मीटर व जगदीश घोसले ते मारोती घोसले यांचे घरापर्यंत ३५ मीटर, असा एकूण ७० मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र अंदाजपत्रकामध्ये निधीनुसार ४७ मीटर कामाला मंजुरात मिळाली. त्यामुळे ७० मीटर घेतलेले काम पूर्ण झाले नाही. परिणामी २३ सप्टेंबरच्या मासिक सभेमध्ये ठरावात बदल करून त्याच प्रभागात ३५ मीटर काम व उर्वरित १३ मीटर काम अपूर्ण असलेला रस्ता भाऊराव ठाकरे ते साबरे यांच्या घरापर्यंत घेण्यासाठी चर्चा केली. तथापि या कामाला विरोधी सदस्य विकास भोंगळे यांनी विरोध दर्शविल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आता गावातील सोसायटीची निवडणूक होणार असून ही निवडणूक डोळ्या समोर ठेवून भोंगळे सरपंचाविरूद्ध खोटे आरोप करीत असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. प्रथम घेतलेले काम करा, अन्यथा निधी परत गेला तरी चालेल, परंतु दुसरे काम करायचे नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. ही दोन्ही कामे नियमाला धरून रद्द करून घेतलेल्या २२ जूनच्या ठरवात बदल केला व प्रभाग क्रमांक तीमधील देवराव काळे ते बाळू वैद्य यांच्या घरापर्यंत काम करण्याचा ठराव बहुमताने पारीत करण्यात आला. त्याला गटविकास अधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली. त्यामुळे निधी परत जाणार नाही, निधी खर्च करण्याची मुदत ३१ डिसेंबर असल्याने तीन महिने बाकी आाहे. विरोधक विकास कामात अडथळा निर्माण करून महिला सरपंचावर विविध आरोप करून बदनामी करीत असल्याचाही आरोप सरपंच गेडाम यांनी निवेदनातून केला आहे. अडथळा करणाऱ्यांना अंकुश लावावा, अशी मागणी सरपंच गेडाम यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)