भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध

By Admin | Updated: November 26, 2014 23:12 IST2014-11-26T23:12:40+5:302014-11-26T23:12:40+5:30

काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णत: उद्ध्वस्त करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांना आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. मात्र त्यासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू असून नेमकी

Opposition of the ministers to BJP MLAs | भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध

भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध

‘गॉडफादर’मार्फत फिल्डींग : आर्णी-केळापूर आणि यवतमाळच्या आमदारात रस्सीखेच
यवतमाळ : काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्णत: उद्ध्वस्त करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांना आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. मात्र त्यासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू असून नेमकी कुणाला लॉटरी लागते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जात होता. कारण येथे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार यांच्यासारखे दीर्घ अनुभवी नेते आहेत. गेल्या विधानसभेत काँग्रेसचे सात पैकी तब्बल पाच आमदार होते. भाजपाला काँग्रेसने जिल्ह्यातून विधानसभेत खातेही उघडू दिले नव्हते. मात्र पाचच वर्षात भाजपाने हीच स्थिती काँग्रेसवर आणली. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाचही आमदारांचा पराभव करून या जागा भाजपाने पटकाविल्या. भाजपच्या या नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिमंडळाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत कुणालाही संधी मिळाली नाही. मात्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्याचे सांगण्यात येते. या विस्तारात आपल्याला संधी मिळावी म्हणून पाचही आमदारांनी आपल्या गॉडफादरमार्फत मोर्चेबांधणी चालविली आहे.
यवतमाळचे भाजपाचे आमदार मदन येरावार यांची या विस्तारात मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असला तरी त्यांच्या बोलण्यातील हूरहूरही लपून राहात नाही. कारण मदन येरावार यांना मंत्रिमंडळातील वर्णीसाठी स्पर्धक म्हणून आर्णी-केळापूरचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांचे तगडे आव्हान आहे. कारण मदन येरावार यांच्यावर गडकरी समर्थक म्हणून शिक्का लागला आहे. तर तोडसाम हे फडणवीस यांच्या ‘गुडबूक’मधील मानले जातात. तोडसाम यांच्या माध्यमातून आदिवासी-गोंड समाजाला मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर स्वत: दिल्लीतून मोर्चेबांधणी करीत असल्याचे सांगितले जाते. अहीर यांनी तोडसाम यांना तसा शब्दही दिला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौऱ्यात आमदार राजू तोडसाम यांची संपूर्णवेळ त्यांच्याशी असलेली जवळीक बरेच काही सांगून जाते. सलग आठ टर्म विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आणि गेली कित्येक वर्ष मंत्री राहिलेल्या शिवाजीराव मोघे या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला पराभूत करून राजू तोडसाम मताधिक्याने निवडून आल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते ‘इम्प्रेस’ झाले आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील अन्य गडकरी समर्थकांऐवजी तोडसाम यांचा प्राधान्याने विचार केला जात असल्याची माहिती आहे. पांढरकवडा तालुक्यात भाजपाचे प्रचंड गट-तट असताना तीन वर्षांपूर्वी हंसराज अहीर यांनी तालुकाध्यक्षपदाची माळ राजू तोडसाम यांच्या गळ्यात घातली होती. तोडसाम यांनी गटा-तटाला एकत्र आणून पक्षबांधणी केली. विधानसभेच्या निकालाने त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामावरही शिक्कामोर्तब केले. तोडसाम यांच्या या अनेक ‘प्लस पॉर्इंट’मुळेच येरावार समर्थकांची हूरहूर वाढली आहे.
उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्याकडेही पक्षात गडकरी समर्थक म्हणूनच पाहिले जाते. गडकरी-फडणवीस वाद पक्षात सर्वश्रृत आहे. या वादात येरावार, नजरधने हे भरडले जाण्याची दाट शक्यता आहे. आर्णी-केळापूर मतदारसंघावर गेली कित्येक वर्ष आदिवासीतील आंध समाजाचे वर्चस्व राहिले आहे.
यावेळी पहिल्यांदाच तोडसाम यांच्या माध्यमातून गोंड समाजाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची संधी आहे. आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे असल्यानेच तोडसाम यांचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सांगितले जाते. राळेगावचे आमदार प्रा. अशोक उईके आणि वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हेसुद्धा आपल्या परीने प्रयत्नरत आहेत. छुप्या फिल्डींगद्वारे त्यांनीही मदन येरावार यांच्यापुढे अप्रत्यक्ष आव्हान ठेवले आहे. जिल्ह्यातील भाजपाचे पाचही आमदार मंत्रीपदासाठी प्रयत्नरत असताना नेमके कुणाचे नशीब फळफळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Opposition of the ministers to BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.