थकबाकीदार ग्राहकांना अभय योजनेची संधी

By Admin | Updated: September 28, 2016 00:47 IST2016-09-28T00:47:57+5:302016-09-28T00:47:57+5:30

वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलामुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे

Opportunity for Abbey Scheme for outstanding customers | थकबाकीदार ग्राहकांना अभय योजनेची संधी

थकबाकीदार ग्राहकांना अभय योजनेची संधी

महावितरण : २५ वर्र्षांत ३८ लाख ग्राहकांची जोडणी कापली
यवतमाळ : वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलामुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी आता महावितरणकडून अभय योजना राबविली जाणार आहे. नोव्हेंबर २०१६ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सातत्याने आपल्याकडे विजेच्या बिलाची रक्कम न भरल्यामुळे थकबाकीदार झालेल्या ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. अशा ग्राहकांना आता पुन्हा एकदा अभय योजनेंतर्गत मुख्य प्रवाहात सामावून घेवून त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हजारोच्या संख्येने असे ग्राहक आहे, तर राज्यातून एकूण ३८ लाख थकबाकीदार वीज ग्राहकांना अभय योजनेचा फायदा होवू शकतो. जून २०१६ अखेरपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लाखो वीज ग्राहकांच्या थकबाकीचा आकडा पाच हजार ४०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे या लाखो वीज ग्राहकांचा पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.
येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत वीज ग्राहकांना मुद्दल आणि दंडाची रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत करता येणार आहे.
महावितरणने संजीवनी योजनेंतर्गत व्याजाची रक्कम माफ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच व्याजाच्या रकमेतूनही सवलत मिळवत थकबाकीदार ग्राहकांना आपली वीज जोडणी पूर्ववत करता येईल. परंतु गेल्या २५ वर्षामध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक कोणत्या माध्यमातून वीज वापरतात हा प्रश्नदेखील महावितरणसमोर आहे. या बाबीचा शोध घेण्याचे आवाहनसुद्धा महावितरणसमोर निश्चितच आहे. (प्रतिनिधी)

मुद्दल व दंडाची रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत होईल
विविध कारणांमुळे गेल्या २५ वर्षात राज्यातील ३८ लाख वीज ग्राहकांची वीज जोडणी बंद करण्यात आल्यामुळे ते कायमस्वरूपी थकबाकीदार झाले. आता या सर्व वीज ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न महावितरणकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी अभय योजना राबविली जाणार असून नोव्हेंबरमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत २५ वर्षात थकबाकीदार झालेले वीज ग्राहक जर पुन्हा आपली वीज जोडणी पूर्ववत करू इच्छित असल्यास त्यांना संधी आहे. त्यासाठी त्यांना वीज बिलाची मुद्दल व दंडाची थकीत रक्कम भरून वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. याचा लाभ घेण्याचा अशा ग्राहकांनी प्रयत्न करणे महावितरणच्याही फायद्याचेच आहे. कारण काही प्रमाणात का होईना महावितरणची वसुली यातून होणार आहे.

Web Title: Opportunity for Abbey Scheme for outstanding customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.