रेती तस्करांवर कारवाई व महसूलही घटला
By Admin | Updated: March 18, 2015 02:27 IST2015-03-18T02:27:26+5:302015-03-18T02:27:26+5:30
तालुक्याचा महसूल विभाग रेती तस्करांवर कारवाईत यावर्षी मागे पडला आहे. परिणामी दंडापोटी वसूल रकमेचा आलेखही खाली उतरला. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.

रेती तस्करांवर कारवाई व महसूलही घटला
राळेगाव : तालुक्याचा महसूल विभाग रेती तस्करांवर कारवाईत यावर्षी मागे पडला आहे. परिणामी दंडापोटी वसूल रकमेचा आलेखही खाली उतरला. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.
तालुक्यात १५ रेती घाट आहेत. त्यातील केवळ पाच रेती घाटांच्या लिलावाची परवानगी पर्यावरण विभागाने दिली होती. त्यातील आष्टा ५४ लाख ६२ हजार, रामतीर्थ ३० लाख ९६ हजार तर झुल्लर १६ लाख २५ हजार याप्रमाणे तीन घाटांमधून एक कोटी दोन लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. सन २०१३ मध्ये दीड कोटी तर १४-१५ मध्ये एक कोटी ८० लाख इतका महसूल शासनाला मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी प्राप्त महसूल निम्मा झाला आहे.
गतवर्षी २४१ चोरीच्या प्रकरणात नऊ लाख ९३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यावर्षी डिसेंबर अखेर केवळ ६९ प्रकरणात तीन लाख ५० हजार एवढा दंड वसूल झाला आहे. गतवर्षी महसूल विभागाची कामगिरी सरस होती. यावर्षी जेमतेम राहिल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले.
यावर्षी कमी घाटाच्या लिलावामुळे आॅक्टोबर ते जानेवारी अखेरपर्यंत रेती चोरट्यांना मोकळे मैदान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. रेती घाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपल्यानंतर नवे लिलाव जानेवारीमध्ये होवून ताबा घेईपर्यंतचा काळ चोरट्यांना फावला. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात महसूल यंत्रणा या कार्यात व्यस्त असल्याचा फायदा चोरट्यांनी उचलला.
नवे, जुने ट्रक, ट्रॅक्टर असलेले, रेती घाटाकडील गावात वास्तव्य असणारे ठेकेदार, बिल्डींग मटेरियल सप्लायर, राजकीय पक्षाचा आडोसा घेवून सक्रिय असणारे काही महाभाग या व्यवसायात सामील आहे. मोठ्या प्रमाणात माया जमवून उजळ माथ्याने फिरत आहे. त्यांनी आपले हस्तक ठिकठिकाणी पेरले आहे. सर्वत्र नजर ठेवून आपल्या कारभारात जम बसविला आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)