कुंटणखान्यावर प्रतिष्ठितांचे ‘कनेक्शन’ उघड
By Admin | Updated: March 5, 2017 00:52 IST2017-03-05T00:52:51+5:302017-03-05T00:52:51+5:30
नागरिकांच्या सतर्कतेने वाघापूर-पिंपळगाव रोडवरील एका कुंटणखान्याचा छडा लागला. तपासात शहरातील

कुंटणखान्यावर प्रतिष्ठितांचे ‘कनेक्शन’ उघड
यवतमाळ : नागरिकांच्या सतर्कतेने वाघापूर-पिंपळगाव रोडवरील एका कुंटणखान्याचा छडा लागला. तपासात शहरातील अनेक प्रतिष्ठीत या कुंटणखान्याच्या ‘कनेक्शन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बयानासाठी ‘निमंत्रण’ देताच त्यांच्यात मात्र धडकी भरली.
पिंपळगाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये कुंटणखाना चालतो. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागल्याने या नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार नोंदविली. त्याची दखल घेत २२ फेब्रुवारी रोजी या कुंटणखान्यावर धाड घातली. पोलिसांनी या कुंटनखान्यावर ये-जा असलेल्यांची ‘कुंडली’ संबंधितांच्या मोबाईलवरून (सीडीआर) तपासली असता त्यात शहरातील कित्येक प्रतिष्ठीतांचे ‘कनेक्शन’ उघड झाले. त्यात अनेक राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. समाजात प्रतिष्ठीत म्हणून मिरविणाऱ्या व दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. या बहुतांश प्रतिष्ठितांना बयानाच्या निमित्ताने ठाण्यात हजर होण्याचे ‘निमंत्रण’ दिले. आपला चेहरा उघड होणार म्हणून सर्वांनाच धडकी भरली. यातील काहींनी आपले वजन वापरुन बयानापासून सुट मिळविली. मात्र गॉडफादर नसलेल्यांची पोलिसांपुढे पेशी झाली. त्यांची बयाने रेकॉर्डवर येते का, याकडे नजरा आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
कुंटनखान्यावर चार महिला सापडल्या. यातील तिघींना अकोला रिमांड होममध्ये पाठविण्यात आले. नंतर अन्य एक तरुणी व तिच्या दलालाला अटक करण्यात आली. हा दलाल आर्णीचा तर तरुणी सावळीसदोबा परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.