राळेगावचे रुग्णालय केवळ दोन डॉक्टरांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:29+5:30
डॉक्टरांकरिता येथे तीन निवासस्थाने आहेत. एका निवासस्थानावर दुसरे कर्मचारी अनधिकृतपणे राहतात. एका क्वॉर्टरचे बिल माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने थकीत ठेवल्याने त्या वादात बंद आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन-दोन डॉक्टर कसेबसे दाटीने एकत्र राहात आहेत. वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी करूनही काहीएक कारवाई झालेली नाही. २४ कर्मचाऱ्यांपैकी आठ कर्मचारी येथे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले आहे.

राळेगावचे रुग्णालय केवळ दोन डॉक्टरांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण ओपीडीत असतात. अनेक रुग्ण भरती असतात. याशिवाय अत्यवस्थ रुग्ण, प्रसूतीच्या केसेस, एमएलसी, शवविच्छेदन, यवतमाळ, अकोला स्थानिक मिटींग आदींमध्ये डॉक्टरांची सतत व्यस्तता राहते. असे असताना गेल्या वर्षीपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार केवळ दोन डॉक्टरांच्या भरवशावर चालविला जात आहे.
येथे स्थापनेपासून २०-२५ वर्षात एक-दोन वर्षांचा अपवाद वगळता प्रथमश्रेणी एम.डी. अधीक्षक कधीच देण्यात आले नाही. प्रभारावरच या पदाचा कारभार चालू आहे. त्यातच एका वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त असल्याने दोन डॉक्टरांना सतत सर्वच कामे दिवसरात्र करावी लागतात. आठ तासांची ड्यूटी, सुटी आदी बाबी केवळ कागदावरच राहून जातात.
डॉक्टरांकरिता येथे तीन निवासस्थाने आहेत. एका निवासस्थानावर दुसरे कर्मचारी अनधिकृतपणे राहतात. एका क्वॉर्टरचे बिल माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने थकीत ठेवल्याने त्या वादात बंद आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन-दोन डॉक्टर कसेबसे दाटीने एकत्र राहात आहेत. वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी करूनही काहीएक कारवाई झालेली नाही. २४ कर्मचाऱ्यांपैकी आठ कर्मचारी येथे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले आहे. एकीकडे त्यांच्या या काळात बदल्या झालेल्या नाहीत, तर दुसरीकडे रुग्णांच्या आरोग्यसेवेत त्यांच्याकडून कुचराई केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
रुग्णांना सन्मानाची वागणूक देण्याऐवजी अपमानित करणे आदी प्रकार घडत आहेत. एका कर्मचाºयास तब्बल चारवेळा निलंबित केले. तरी त्याच्या वागण्यात कवडीचाही फरक पडला नसल्याचे सांगितले जाते. रुग्णसेवेकरिताच नेमणूक करण्यात आली असल्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसून येते.
ट्रामा सेंटर पूर्ण होऊनही प्रतीक्षाच
अडीच कोटी रुपये खर्च करून आपात्स्थिती, अपघात आदीतील रुग्णांना त्वरित येथेच परिपूर्ण सेवा मिळावी म्हणून ट्रामा सेंटरकरिता इमारत बांधण्यात आली. याकरिता पदभरती करण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधींकडून दोन वर्षांपासून सांगितले जात आहे. पण अद्यापही पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे इमारतीचा उपयोग रुग्णांकरिता होऊ शकलेला नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांच्या अखत्यारित आता या प्रश्नाला गती देण्याची गरज व मागणी आहे.