अवघे वेळाबाईवासीय हळहळले
By Admin | Updated: October 11, 2015 00:42 IST2015-10-11T00:42:13+5:302015-10-11T00:42:13+5:30
तालुक्यातील वेळाबाई येथील होतकरू युवक संदीप सुरेश रासेकर (२२) याचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे अपघाती मृत्यू झाला.

अवघे वेळाबाईवासीय हळहळले
वणी : तालुक्यातील वेळाबाई येथील होतकरू युवक संदीप सुरेश रासेकर (२२) याचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे अपघाती मृत्यू झाला. त्याला शुक्रवारी संपूर्ण गावाने श्रद्धांजली अर्पण करून हळहळ व्यक्त केली.
अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेत असतानाच संदीपला महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीक बोर्डमध्ये नोकरी लागली होती. ती स्विकारून गरीब आई-वडिलांचे पांग फेडण्यास सक्षम होणाऱ्या संदीपच्या अपघाती मृत्युमुळे अवघे गाव हळहळले. संदीप अत्यंत मनमिळावू आणि संपूर्ण गावाला आपलासा वाटणारा युवक होता. गरिबीतून वाट काढत त्याचे शिक्षण सुरू होते. शिक्षण घेत असतानाच तो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक बोर्डमध्ये नोकरी स्वीकारून बसमत (जि.हिंगोली) येथे वर्षभरापूर्वी रूजू झाला होता.
नोकरीमुळे संदीपच्या परिवाराचे वाईट दिवस जाऊन चांगल्या दिवसांची सुरूवात झाली होती. मात्र काळाने डाव साधला अन् ६ आॅक्टोबरला वसमत येथे काम करताना इलेक्ट्रीक खांबावर जिवंत विद्युत तारेला चिपकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची खबर कळताच अख्खे वेळाबाई हादरले. रासेकर परिवारावर उजेडाचे किरण पडताच पुन्हा गडद अंधार पसरला. गावकऱ्यांच्या सुख-दु:खात धावणारा, सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होणारा संदीप ऐन तारूण्याच्या बहरात गळून पडला. त्याच्या जाण्याने त्याचा परिवारच नव्हे, तर संपूर्ण गाव दु:खाने हळहळत आहे. शुक्रवारी त्याला गावात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महावितरणचे कर्मचारी, त्याचे नातलगत व संपूर्ण वेळाबाईवासीय डबडबलेल्या डोळ्यांनी उपस्थित होते. त्याच्या मागे आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)