तीन वर्षात केवळ ५९ घरकूल
By Admin | Updated: March 17, 2015 01:15 IST2015-03-17T01:15:57+5:302015-03-17T01:15:57+5:30
समाज कल्याण विभागाने शहरी भागातील मागास वस्तीसाठी घरकूल योजना सुरू केली आहे.

तीन वर्षात केवळ ५९ घरकूल
यवतमाळ : समाज कल्याण विभागाने शहरी भागातील मागास वस्तीसाठी घरकूल योजना सुरू केली आहे. मात्र यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दीत तीन वर्षात केवळ ५९ घरकूल पूर्णत्वास गेली. समाज कल्याण विभागाच्या लालफीतशाहीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दीत गत तीन वर्षात २१३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यात अशोकनगर, डोर्लीपुरा, पाटीपुरा, अंबिकानगर या भागांचा समावेश आहे. घरकुलासाठी लाभार्थ्यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्याचे नकाशे समाज कल्याण विभागाकडे गेले आहे. मात्र तीन वर्षात केवळ ५९ घरकुलाचे काम पूर्ण झाले. २५४ घरकुले समाज कल्याण विभागाच्या लालफीतशाहीत अडकले आहे. या घरांसाठी निधीच उपलब्ध करून दिला नाही. परिणामी घरकुलाचे काम सुरूच झाले नाही.
लाभार्थ्यांच्या घरकूल बांधकामाला ३१ मार्चपूर्वी प्रारंभ झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना दिला आहे. लाभार्थ्यांना घरकुल कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर)